नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या घटनादुरुस्तीकडे देशातील तमाम महिला आशेने पाहात होत्या. पण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्ष या चार पक्षांनी या आरक्षणाला विरोध करून महिलांच्या राजकीय हक्कांची भ्रूणहत्या केली, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दूरचित्रवाणीवर प्रसारित देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या चारही पक्षांना त्यांच्या चुकांची शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही मोदींनी दिला.
लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला आरक्षण व मतदारसंघांच्या फेररचनेसंबंधी घटनादुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाले. केंद्रातील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच रालोआ सरकारला मोठ्या राजकीय पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री ८.३० वाजता दूरचित्रवाणीवर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. महिला आरक्षण लागू करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संसदेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक पुन्हा आणले जाईल, असे मोदींनी सूचित केले.
लोकसभेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बाके वाजवून जल्लोष केला. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, संसदेत जे घडले, ते केवळ बाकांवर थाप मारण्यापुरते मर्यादित नव्हते. तर, तो महिलांच्या सन्मानावर आणि आत्मसन्मानावर केलेला हल्ला होता. एखादी स्त्री अनेक गोष्टी विसरू शकते. पण आपला अपमान कधीच विसरत नाही. संसदेतील काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे वर्तन देशभरातील महिलांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे. देशातील महिलांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. आम्ही महिला आरक्षण विधेयक मंजूर करू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले.
महिला आरक्षणाचा मुद्दा लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडण्याला इंडिया आघाडीने विरोध केला होता. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांचे नुकसान हईल असा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, हा आरोप मोदींनी फेटाळला. महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश कोणाकडून काही हिरावून घेणे हा नव्हता, तर प्रत्येकाला काहीतरी देण्याचाच होता. महिला आरक्षण विधेयकाद्वारे २१ व्या शतकातील महिलांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचा प्रयत्न होता. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सप आणि द्रमुक हे पक्ष देशाचे संविधान आणि महिलांच्या विरोधात आहेत. काँग्रेसने नेहमीच महिला आरक्षणाला विरोध केला आहे. काँग्रेस आपल्या चुका सुधारेल अशी मला अपेक्षा होती. पण, प्रादेशिक पक्षांची ताकद वाढलेली काँग्रेसला मान्य नाही.
महिला जर सामर्थ्यवान झाल्या, तर त्या घराणेशाहीवर चालणार्या पक्षांसाठी धोका ठरतील, अशी भीती काँग्रेसला वाटते, असा दावा मोदींनी केला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मतदारसंघांच्या फेररचनेसंदर्भात सतत खोटे बोलत आहेत. त्यांनी ब्रिटिशांकडून ‘फोडा आणि राज्य करा’ हेच धोरण शिकले आहे. काँग्रेसने नेहमीच विभाजनवादी राजकारण केले आहे. म्हणूनच ते कथित ‘उत्तर-दक्षिण’ विभाजनाबाबत अपप्रचार करत आहेत. आम्ही वारंवार सांगत आलो आहोत की, प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व समप्रमाणात वाढेल. हे विधेयक मंजूर झाले असते, तर सर्व राज्यांचा फायदा झाला असता. पण विरोधी पक्षांनी आपल्याच लोकांची फसवणूक केली आहे, असा प्रहार मोदींनी केला.
‘नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक’ ही महायज्ञ आणि उदात्त मोहीम होती. त्या मार्गातील अडथळे दूर करून २१ व्या शतकातील भारतीय महिलांना नव्या क्षितिजांकडे भरारी घेण्यासाठी पंख देणे हा विधेयकामागील हेतू होता. देशातील निम्म्या लोकसंख्येला यथोचित हक्क मिळवून देण्याचा हा प्रामाणिक, निखळ प्रयत्न होता. महिलांना देशाच्या प्रगतीच्या प्रवासातील समान भागीदार बनवणे ही काळाची हाक आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा देशातील कुठल्याही कोपर्यातील राज्याचा आकार वा लोकसंख्या कितीही असली, तरी संसदेत त्यांचा आवाज अधिक बुलंद करण्याचा आणि प्रत्येकाला समान प्रमाणात सक्षम करण्याचा प्रयत्न होता, असे मोदी म्हणाले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली ६६ टक्के मते आम्हाला मिळाली नसली, तरी मला खात्री आहे की, देशाची १०० टक्के नारीशक्ती आमच्या पाठीशी उभी आहे. देशातील प्रत्येक महिलेला मी आश्वस्त करतो की, महिला आरक्षणाच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आम्ही दूर करू. आमचे मनोधैर्य उंचावलेले आहे, आमचे धैर्य अभेद्य आहे आणि आमचा निर्धार ठाम आहे, असे मोदी म्हणाले.
नैराश्यातून भाषण; काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैराश्यातून ‘देशाला उद्देशून करायच्या भाषणा’चे रुपांतर राजकीय भाषणात केले, अशी टीका काँग्रेसने केली. पंतप्रधानांनी सध्याच्या लोकसभेतच महिला आरक्षण लागू करावे, असे आव्हान काँग्रेसने दिले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात केवळ विरोधकांवर चिखलफेक आणि धडधडीत असत्याचा भडिमार होता.’ विधानसभा निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू असतानाही पंतप्रधानांनी हे भाषण केले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेस लक्ष्य
काँग्रेस हा सुधारणाविरोधी पक्ष असल्याची टीका करत पंतप्रधान मोदींनी या पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले…
’सुधारणा हा शब्द कानावर पडला की काँग्रेस त्या रोखण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावतो. माओवादी आणि नक्षलवादाचा खात्मा करण्याच्याही काँग्रेस विरोधात आहे.
’काँग्रेसमुळेच भारत विकासाच्या शिखरावर पोहोचू शकला नाही. आपल्याबरोबरच स्वातंत्र्य मिळालेले इतर देश आज आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत.
’काँग्रेसने सीमावाद प्रलंबित ठेवले. ‘वन रँक वन पेन्शन’ योजनाही लटकत ठेवली. ओबीसींचा मुद्दाही प्रलंबित ठेवला.
’आमची ही लढाई काँग्रेसच्या सुधारणाविरोधी आणि नकारात्मक वृत्तीविरोधात असून देशातील महिला काँग्रेसला सडेतोड उत्तर देतील.
विरोधी पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांच्या सक्षमीकरणाचा लढा थांबला आहे. महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी पाप केले आहे आणि त्यांना याची शिक्षा नक्कीच मिळेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
