सोशल मीडिया, इन्स्टाग्राम रील्स आणि झटपट यशाच्या धावपळीत गुंतलेल्या आजच्या ‘जेन झी’ (Gen Z) पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “आयुष्यात कधीही शॉर्टकट शोधू नका, कारण एखादा चुकीचा शॉर्टकट तुम्हालाच कट (नष्ट) करू शकतो,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी तरुणांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन केले आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स'(Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राच्या प्रकाशनवेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

रेल्वे स्टेशनवरील फलकाचा दाखला देत दिला मोठा संदेश

आपल्या भाषणात रेल्वे स्टेशनवरील एका प्रसिद्ध फलकाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “अनेकदा लोक सुरक्षित फूटओव्हर ब्रिजचा वापर करण्याऐवजी वेळ वाचवण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. पण तिथेच पाटीवर स्पष्ट लिहिलेले असते— ‘A shortcut will cut you short’ म्हणजेच ‘शॉर्टकट तुमचा प्रवासच संपवू शकतो’. हाच नियम आयुष्यालाही लागू होतो.”

वेगवेगळ्या दिशेने आकर्षित करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपासून तरुणांनी सावध राहावे, असे सांगत पंतप्रधान पुढे म्हणाले, “जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच पुढे जायचे असेल, तर तुम्ही ज्यांना आपला आदर्श मानता अशा महान व्यक्तींची आत्मचरित्रे आवर्जून वाचा.”

तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारचा ‘डिजिटल’ प्लॅन

गेल्या काही काळात देशभरात झालेल्या आंदोलनांनंतर, केंद्र सरकारने आणि भारतीय जनता पक्षाने तरुण पिढीशी संवाद साधण्यासाठी आपल्या रणनीतीत मोठे बदल केले आहेत. आजच्या ऑनलाइन आणि डिजिटल जगात वावरणारी तरुणाई ज्या भाषेत संवाद साधते, त्याच भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत.

पंतप्रधान मोदी स्वतः इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय झाले असून, ‘सेल्फी स्टाईल’ व्हिडिओंच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

  • ‘Hi, Friends’ सारख्या अनौपचारिक संवादाचा वापर
  • ‘First in my bloodline’ सारख्या व्हायरल वाक्यांचा वापर
  • भारतीय वस्त्रांचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘GRWM’ (Get Ready With Me) ट्रेंडचा वापर

कॅबिनेट बैठकीतही पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय राहण्याचे आणि क्लिष्ट सरकारी भाषेऐवजी सोप्या व सहज समजतील अशा स्वरूपात व्हिडिओ बनवण्याचे निर्देश दिले आहेत. या रणनीतीचाच एक भाग म्हणून नुकतेच परराष्ट्र मंत्रालयानेही ‘स्नॅपचॅट’वर आपले अधिकृत खाते सुरू केले आहे.