संसदेमध्ये राज्यघटना (१३१वी दुरुस्ती) विधेयक २०२६ मंजूर न होऊ देऊन तृणमूल काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारसभेत केला. तर तमिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महिला आरक्षणाचाच मुद्दा उपस्थित करत द्रमुकला लक्ष्य केले.

जनगणनेविनाच लोकसभा मतदारसंघांची फेररचना करून महिलांना आरक्षण देणारे घटनादुरुस्ती विधेयक दोन-तृतियांश बहुमताअभावी शुक्रवारी फेटाळले गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काँग्रेससह तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या प्रमुख विरोधी पक्षांना महिलांविरोधी ठरवण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे

पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, बंगालमधील महिला सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत शिक्षा देतील. ते म्हणाले, “आमची अशी इच्छा आहे की विकसित भारताच्या उभारणीत आमच्या मुलींची भूमिका विस्तारावी. अधिकाधिक मुलींनी राजकारणात प्रवेश करावा. पण संसदेत काय झाले ते तुम्ही पाहिले. तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बंगाली भगिनींचा विश्वासघात केला.” बंगाली महिला राज्यातील महाजंगलराजला आव्हान देत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केला, असा दावा मोदींनी केला.

दुसरीकडे, तमिळनाडूच्या इरोड येथे एका रोडशोदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी द्रमुकला महिलाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला. महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये राखीव जागा मिळू नये यासाठी काँग्रेस आणि द्रमुकने त्यांचा विश्वासघात केला, असा दावा शहा यांनी केला. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हा कट यशस्वी होऊ देणार नाही आणि देशातील महिलांना न्याय मिळेल याची आम्ही खबरदारी घेऊ असे शहा म्हणाले. तर वासुदेवनल्लुर येथे प्रचारसभेत बोलताना महिला आरक्षण लागू करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेस आणि द्रमुकवर टीका केली.

पश्चिम बंगालच्या भगिनींना ३३ टक्के आरक्षण हवे होते आणि मोदींनी त्याची खबरदारी घेतली. त्यांना ते २०२९पासूनच लागू करायचे होते. पण तृणमूल काँग्रेसची तशी इच्छा नव्हती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान