सर्वच राजकीय पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. आज तक वृत्तवाहिनीच्या ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात ओवेसी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यात उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत जोरदार वाद झाला.

ओवेसी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात सर्वांना हिंदू बनवले होते, पण बाबांनी (योगी आदित्यनाथ) साडेचार वर्षात इतका ठाकूरवाद केला आहे की त्यांचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य स्वतःला मौर्य जातीचे म्हणवून घेत आहेत. आणि दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो, की मी ब्राह्मण आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात अनेक जाती ठेवल्या तरी हरकत नाही.”

ओवेसींच्या ठाकूरवादाच्या आरोपावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, “निवडणुकीत जिना यांचे नाव आम्ही नाही तर अखिलेश यादव यांनी घेतले होते. ‘अयोध्या रायझिंग’ हे पुस्तक भाजपाने लिहिलेले नसून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिले आहे. जिना यांचा मुद्दा कोणी पकडला? असं विचारलं असता यावर भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, हा मुद्दा कोणी पकडला यापेक्षा, हा मुद्दा कोणी उपस्थित केला ते बघा.”

अँकरने ओवेसींना विचारले की, तुम्ही फक्त १९% लोकांचे राजकारण करण्याबद्दल बोलत आहात? याला उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “जे बलवान आहेत त्यांच्याबद्दल बोलले जाते पण जे कमकुवत आहेत त्यांच्याबद्दल बोलले जात नाही. जे कमकुवत आहेत त्यांना आधार देऊन वर उचलायचे आहे. यूपीचे वास्तव काय आहे, हे मला माहित आहे. येथे शिक्षणापासून बेरोजगारीपर्यंत स्थिती खूप वाईट आहे. केवळ मुस्लिमांची स्थिती वाईट आहे, असे मी म्हणत नाही.”

समाजवादी पार्टी ही असदुद्दीन ओवेसी यांची बी टीम असल्याचा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. त्रिवेदी म्हणाले की, “हे जातीयवादी म्हणून बोलतात पण जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वजण ठाकूर, ब्राह्मण आणि यादव हेच करतात. हे लोक मुस्लिमांमधील सुन्नी, शिया, बरेलवी, हदीस यांवर कधीच का बोलत नाहीत. मी हिंदू-मुस्लिम दंगली कधीच पाहिल्या नाहीत तर सिया-सुन्नी दंगली पाहिल्या आहेत,” असंही सुधांशु त्रिवेदी म्हणाले.