PM Modi minimize appeal for use of petrol, diesel, and gold: “पेट्रोल आणि डिझेलचा शक्य तेवढा कमी वापर करा, वर्षभर सोन्याची खरेदी करु नका आणि घरुनच काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्राधान्य द्या”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना केले. रविवारी तेंलगणा आणि कर्नाटकातून नागरिकांना साद घातल्यानंतर पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये बोलत असताना नागरिकांना काटकसर करण्याचे आवाहन केले. “काही शाळांनी देखील ऑनलाईन क्लासेस घेण्याबाबत विचार करावा आणि कार्यालयांनी व्हर्च्युल मिटिंगवर भर द्यावा”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सोनं खरेदी करणे टाळा, खाद्यतेलाचा कमी वापर करा – पंतप्रधान
“सोन्याच्या आयातीवर देशातील खूप पैसे विदेशात जातात. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत सोनं खरेदी करणे टाळावं, सोन्याची गरज नाही. सध्या व्होकल फॉर लोकलला बळ देण्याची वेळ आली आहे. स्थानिक व्यवसायांना प्राधान्य द्यायला हवं. डिझेल पंपा ऐवजी सौर उर्जेवर चालणाऱ्या पंप वापरण्यास प्राधान्य द्यायला हवं. रासायनिक खातांचा वापर न करता, नैसर्गिक शेती करण्यावर भर द्यायला हवा. नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर देखील कमी करावा”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संकट काळात सरकारने केलेल्या आवाहनांना जनतेने नेहमीच सहकार्य केले आहे. आज देखील नागरिकांना हे कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे.
मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन
“देशाचे सर्वात जास्त परकीय चलन कच्च्या तेलाच्या खरेदीवर खर्च होते. त्यामुळे शक्य तेवढा पेट्रोल -डिझेलचा वापर कमी करा. मेट्रोचा वापर करा. कार असणाऱ्या लोकांनी इतरांना लिफ्ट द्या”. खाद्यतेलाच्या वापराबाबतही काटकसर करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे देश आणि आरोग्याला देखील फायदा होईल, असे मोदी म्हणाले. कर्नाटक आणि तेलंगणामधून देखील देशातील नागरिकांना आवाहन केल्याचे मोदी म्हणाले.
परदेशात लग्न, पर्यटनाची फॅशन
“लग्नासाठी, लग्नानंतर आणि पर्यटनासाठी परदेशात जाण्याची फॅशन झाली आहे. यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर परकीय चलन विदेशात जात आहे. लग्नासाठी भारतासारखे उत्तम स्थान आहे असं मला वाटत नाही. भारताच्या मातीत लग्न केलं तर पूर्वज देखील आशीर्वाद देतील. गुजरातमध्ये तर अशी अनेक ठिकाणं आहेत”. स्टॅच्यु ऑफ युनिटी लग्नासाठी उत्तम स्थळ असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले. “सरदार वल्लभ भाई पाटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. आणि देशात असा व्यक्ती सापडणार नाही ज्याला याचा अभिमान असणार नाही. मी तुम्हाला फार छोटं काम सांगितलं आहे. पण, १४० कोटी नागरिकांची छोटी – छोटी पावलं देखील मोठा परिणाम करतात”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
