पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. “आजच्या काळाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करा,” असे आवाहन त्यांनी रविवारी केले. हैदराबाद येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी देशातील ऊर्जा सुरक्षेवर भाष्य केले.

इंधन बचतीवर भर का?

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद झाल्याने भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, “आपल्याला आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ आवश्यक असेल तेव्हाच करायचा आहे. यामुळे केवळ परकीय चलन वाचणार नाही, तर युद्धाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणामही कमी होईल.”

पर्यायी ऊर्जेसाठी भारताचे पाऊल

पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या वाढत्या ऊर्जा सामर्थ्याचाही उल्लेख केला. भारत आज सौर ऊर्जा निर्मितीत जगात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने पुढील पावले उचलली आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेद्वारे गॅस कनेक्शन दिल्यानंतर आता स्वस्त पाइप गॅस पुरवठ्यावर भर दिला जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वस्त इंधनासाठी सीएनजी जाळ्याचा विस्तार केला जात आहे.

“जिथे मेट्रो उपलब्ध आहे तिथे तिचा वापर करा. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी कारपूलिंगचा वापर करा आणि मालाची वाहतूक करायची असल्यास रेल्वेचा वापर करा. या सर्वांमुळे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यायाने परकीय चलनावरील अवलंबित्वही कमी होईल”, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी लोकांना “एक वर्षासाठी परदेश प्रवास पुढे ढकलण्यास” सांगितले आणि “सणासुदीच्या काळात एक वर्ष सोने खरेदी करू नका” असेही म्हटले.

त्यांनी लोकांना स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहनही केले. “मी सांगत आलो आहे की, ‘स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करा.’ यामुळे या काळात देशाला तर मदत होईलच, शिवाय तुमच्या कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल,” असे मोदी म्हणाले.

आत्मनिर्भरतेच्या विषयावर जोर देत पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही रोजच्या वापरातील वस्तूंची यादी करा आणि त्यांपैकी परदेशी वस्तू कोणत्या आहेत ते शोधा.” याचा अर्थ असा नाही की लोकांनी परदेशी वस्तू फेकून द्याव्यात, असे ते म्हणाले आणि पुढे म्हणाले, “परंतु शक्य तितक्या लवकर आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असले पाहिजेत.”

तेलंगणाला विकासकामांची भेट

पंतप्रधानांनी या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये काझीपेट-विजयवाडा रेल्वे मार्ग, हैदराबादमधील नवीन पेट्रोलियम टर्मिनल आणि वारंगल येथील ‘पीएम मित्रा पार्क’ (काकतिया मेगा टेक्सटाइल पार्क) चा समावेश आहे.

सुमारे १,७०० कोटी रुपये खर्चून उभारलेले हे देशातील पहिले पूर्णतः कार्यरत ‘पीएम मित्रा पार्क’ आहे. केंद्राच्या ‘5F’ व्हिजन (Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign) अंतर्गत हे पार्क कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. ही काकतिया मेगा टेक्सटाइल पार्कची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधानांनी या माध्यमातून केवळ ऊर्जा बचतीचा मंत्र दिला नाही, तर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचे महत्त्वही अधोरेखित केले.