पीटीआय, गुवाहाटी

काँग्रेसने आपल्या राजवटीत इशान्येकडील राज्यांची उपेक्षा केल्याचा तसेच आसाममध्ये बंडखोरील खतपाणी घातल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ते गुवाहाटीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. “काँग्रेसने नेहमीच देशाची सुरक्षा धोक्यात आणली आहे आणि आसाममधील त्यांच्या राजवटीने भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले,” अशी टीका मोदी यांनी केली.

पंतप्रधानांनी काँग्रेसवर घुसखोरांना संरक्षण देण्याचा आरोप केला, परंतु भाजप बेकायदेशीर स्थलांतर संपवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळेच पुढील पाच वर्षे राज्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आसाममध्ये १० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेली काँग्रेस सत्तेत असतानापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि हे त्यांच्या नेत्यांच्या विधानांवरून स्पष्ट होते, असाही आरोप पंतप्रधानांनी केला. (कोट) सात दशकांपासून काँग्रेसने ब्रह्मपुत्रेवर फक्त तीन पूल बांधले, परंतु भाजप सरकारने १० वर्षांत पाच पूल बांधले आहेत असे सांगून भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे आसाममध्ये सर्वत्र विकास होत आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘ईएलएफ’वर ऐतिहासिक लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील ईशान्येकडील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ईएलएफ) ‘सी-१३०जे’ विमानातून ऐतिहासिक लँडिंग केले. ‘‘ईशान्येकडील भागात आपत्कालीन लँडिंग सुविधा मिळत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही सुविधा धोरणात्मक आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी अत्यंत महत्त्वाची ठरेल,’’ असे त्यांनी धावपट्टीच्या उद्घाटनानंतर ‘एक्स’वर लिहिले.

अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले, त्यात ब्रह्मपुत्रेवरील पूल, ‘आयआयएम’ आणि ईशान्य प्रदेशासाठी विदा केंद्राचा समावेश आहे. आसाम विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पांचे उद्दिष्ट संपर्क माध्यम वाढविणे, डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे, उच्च शिक्षणाला चालना आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणे आहे. प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या राजधानीत उद्घाटन केलेला पहिला प्रकल्प ब्रह्मपुत्रेवरील सहा पदरी पूल होता. त्यांनी सुमारे ३,०३० कोटी खर्चून बांधलेला ‘कुमार भास्कर वर्मा सेतू’चे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर मोदी पुलावरून चालत गेले. आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा या वेळी उपस्थित होते. या पुलामुळे गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीमधील प्रवासाचा वेळ फक्त सात मिनिटांपर्यंत कमी होईल.