PM Modi at the start of the Budget Session of Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. कोणतीही योजना असो, ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की ही गोष्ट आम्हाला पसंत न करणारेही मान्य करतात की या सरकारने शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुविधा पोहचवण्यावर भर दिला आहे. आम्ही ही परंपरा पुढेही सुरू ठेवणार आहोत. भारताची डेमोक्रेसी आणि डेमोग्राफी जगासाठी एक मोठा आशेचा किरण आहे. मोदी म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या ध्येय घेऊन ते पुढे चालत राहतील.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावर देखील भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींचे भाषण हे १४० कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती होते. त्यांचे भाषण सर्व खासदारांसाठी मार्गदर्शनात्मक होते. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की त्यांना सर्वांनी गंभीर्याने घेतले असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

१) हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामध्येच अर्थसंकल्प बजेट सादर केला जातो. २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग पूर्ण झाला आहे. दुसर्‍या चतुर्थांश भागाची सुरूवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, जे गाठण्यासाठी आता महत्त्वाच्या २५ वर्षांचा कालावधी सुरू होत आहे. हे शतकातील दुसर्‍या क्वॉर्टरचा हा पहिला अर्थसंकल्प आणला जात आहे. निर्मला सीतारमण देशातील पहिल्या अशा महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग ९व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा महत्त्वपूर्ण क्षण इतिहासात नोंदवला जाणार आहे.

२) युरोपियन युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला विश्वास आहे की भारतातील सर्व उत्पादक याचा लाभ घेतील. ही एक मोठी संधी आहे आणि याचा पहिला मंत्र हा आहे की, आपण गुणवत्तेवर भर द्यावा. बाजारपेठ खुली झाली आहे, त्यामुळे चांगल्यात चांगली गुणवत्ता घेऊन बाजारात उतरा.

3) पंतप्रधान म्हणाले की, जर आपण हे केले तर युरोपियन युनियनमधील २७ देशांच्या ग्राहकांकडून आपण केवळ पैसेच कमावणार नाही, तर त्यांची मनेही जिंकू. याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. कंपन्यांचा ब्रँड जेव्हा देशाच्या ब्रँडबरोबर नवा गौरव प्रस्थापित करतो. आमचे धोरण रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म याचे आहे. आता तर आपण रिफॉर्म एक्सप्रेसवरूनच प्रवास करत आहोत.

४) देश आता दीर्घ काळापासून रखडलेल्या समस्यांमधून बाहेर पडून लाँग टर्म सॉल्यूशन्सच्या मार्गावर पाऊल टाकत आहे. आमच्या प्रत्येक निर्णयामध्ये राष्ट्राची प्रगती हेच आमचे लक्ष्य आहे. पण, आमचे सर्व निर्णय हे मानवकेंद्रित आहेत. आमच्या भूमिका आणि योजना माणसांशी संबंधित आहेत. आम्ही तंत्रज्ञानाचा स्वीकारही करतो आणि त्याबरोबर पुढेही जातो, पण मानवकेंद्रित व्यवस्थेला आम्ही कधीच कमी लेखत नाहीत.

५) पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्हाला पसंद न करणारेही म्हणतात की या सरकारने अखेरच्या व्यक्तीपर्यंत सुविधा पोहोचवण्यावर भर दिला आहे. आम्ही ही परंपरा घेऊन पुढे जाणार आहोत. भारताची डेमोक्रेसी आणि डेमोग्राफी जगासाठी एक मोठी आशा आहे.