PM Narendra Modi highlights the role of Congress, DMK, TMC, and SP in current politics : विरोधकांच्या एकजुटीमुळे नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. शुक्रवारी लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताअभावी हे विधेयक फेटाळले गेले. यामुळे सरकारवर खूप मोठी नामुष्की ओढावली आहे. या अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी, त्यांनी चार पक्षांचा जाणीवपूर्वक चारवेळा उल्लेख केला. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षाला लक्ष्य करून मोदींनी या चारही पक्षावर टीकास्र डागलं.
या पक्षांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली
“काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांचं नुकसान झालं आहे. देशातील कोट्यवधि महिलांची नजर संसदेवर होती, देशाची नारीशक्ती पाहत होती, मलाही हे पाहून खूप दुःखं झालं की नारीहिताचा प्रस्ताव पडला तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि सपासारखी परिवारवादी पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांपासून त्यांचे अधिकार हिरावून घेत हे पक्ष बेंचवर थाप देत होते. त्यांनी फक्त बेंच वाजवले नाहीत, त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. महिला सर्व विसरू शकतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांने संसेदत केलेला व्यवहार महिला कधीच विसरणार नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हे चार पक्ष भ्रूण हत्येचे गुन्हेगार
“नारी शक्ती वंदन विधेयक उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व राज्यांच्या समान तुलनेत जागा वाढणार होत्या. या विधेयकात सर्व राज्यांच्या आवाजाला अधिक शक्ती देण्याचा प्रयत्न होता. राज्य लहान असो वा मोठं असो, लोकसंख्या कमी असो वा जास्त; सर्वांची समान शक्ती वाढवण्याचा प्रयत्न होता. परंतु, या प्रामाणिक प्रयत्नांची काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी संसदेत सर्वांसमोर भ्रूण हत्या केली आहे. काँग्रेस, टीएमसी, डीएमकसे, समावजवादी पार्टी हे भ्रूण हत्येचे गुन्हेगार आहे. हे देशाच्या संविधानाचे गुन्हेगार आहे. देशातील नारीशक्तीचे गुन्हेगार आहे. काँग्रेसला महिला आरक्षणाच्या विषयाचाच तिरस्कार आहे. त्यांनी पूर्वीपासूनच महिला आरक्षण रोखण्यासाठी षडयंत्र आखले आहेत”, असंही मोदी म्हणाले.
घराणेशाही पक्षांना भीती
“काँग्रेसने या विधेयकाला विरोध करून अनेक स्थानिक पक्षांच्या भविष्याला अंधकारात ढकलण्याचं राजकीय षडयंत्र रचले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी, डीएमके इतक्या वर्षांपासून प्रत्येकवेळी तेच कारण देत रडत आहेत, कोणतंही कारण सांगून महिलांच्या अधिकाऱ्यांवर घाला घालत आहेत. देशाला हा राजकीय पत्ता पॅटर्न समजलं आहे. त्यामागचं कारणही त्यांना समजलं आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमाचे हे मोठं कारण आहे की या घराणेशाही जपणाऱ्या पक्षांना भीती आहे. जर महिला सशक्त झाल्या, तर या घराणेशाही पक्षांचं नेतृत्व धोक्यात येईल. त्यांच्या कुटुंबातील बाहेरच्या महिलांनी राजकारणात यावं, असं त्यांना कधीच वाटणार”, असं मोदी म्हणाले.
पक्षांनी संधी गमावली
“डीएमकेकडे संधी होती की ते अधिक जादा तमिळ लोकांना संसदेत पाठवू शकत होते. तामिळनाडूचा आवाज वाढवू शकत होते. पण त्यांनी ती संधी गमावली. टीएमसीकडेही बंगालच्या लोकांना पुढे पाठवण्याची संधी होती. पण त्यांनी ती संधी गमावली. महिलाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप समावजवादी पक्ष पुसू शकला असता, पण सपानेही ही संधी गमावली. समाजवादी पक्ष आधीच राम मनोहर लोहिया यांना आधीच विसरले आहेत”, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
