PM Narendra Modi Opposition Attack Revealing Political Conspiracy: निवडणुकांमधील सलग पराभवांमुळे गेल्या दशकभरापासून आलेली निराशा आणि हताशेतून विरोधक देशाच्या विकासात ‘अडथळे निर्माण करण्याचे’ राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत, देशात फूट पाडण्यासाठी विरोधकांकडून विदेशात गुप्त कारस्थाने रचली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज सार्वजनिक महाभियोग सभा आयोजित केली होती. तसेच उद्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने महासभा होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, “काही शक्ती देशाची फाळणी करण्याच्या कारस्थानांमध्ये सातत्याने गुंतल्या आहेत. भारतमातेच्या लेकरांमध्ये भांडणे लावून फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दशकभराहून अधिक काळ पदरी पडलेल्या अपयशाच्या निराशेपोटी ही मंडळी आता उघडपणे मैदानात उतरली आहेत. विदेशात जाऊन गुप्तपणे कोणाच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत? भारतविरोधी शक्ती कोणाला पाठबळ देत आहेत? आणि भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे? देशातील जनतेने हे सर्व ओळखले पाहिजे आणि या प्रवृत्तींचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे.”
संविधानाचा अवमान आणि ‘दिमागी नक्षलवादा’चा धोका
विरोधकांकडून संविधानाच्या मर्यादा आणि प्रतिष्ठेला तडे दिले जात असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. देशातील नागरिकांनी याविरोधात एकत्रितपणे उभे राहण्याची गरज आहे.
“देशातील दुर्गम भागांतून आपण नक्षलवादाचा बीमोड केला असला, तरी ‘दिमागी नक्षलवादा’चा (शहरी नक्षलवाद) धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे देशाने अशा ‘दिमागी नक्षल्यां’पासून नेहमी सावध राहिले पाहिजे. देशात अस्थिरता निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले; मात्र देशातील नागरिक एकजुटीने उभे राहिले, हीच आपली खरी ताकद आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
जागतिक संकटातही भारताची कणखर कामगिरी
जगभरातील प्रतिकूल परिस्थितीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी भारताच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचा तुटवडा आणि आर्थिक उलथापालथ सुरू असतानाही भारताने आपल्या नागरिकांना जागतिक ऊर्जा संकटाच्या झळा बसू दिल्या नाहीत. अनेक देशांना इंधनाच्या टंचाईचा सामना करावा लागला आणि भारताबाबतही अनेक नकारात्मक भाकिते वर्तवली गेली; मात्र भारताने त्या संकटांवर यशस्वी मात केली.”
