दाहोद (गुजरात) : ‘‘पाकिस्तानचे एकमेव ध्येय भारताचा द्वेष करणे आणि शेजाऱ्यांना हानी पोहोचवणे आहे, तर भारताचे ध्येय गरिबी दूर करणे आणि आर्थिक विकास घडवून आणण्याचे आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमध्ये दाहोद येथील सभेला उद्देशून केलेल्या भाषणात केले. आमच्या बहिणींचे ‘सिंदूर’ पुसण्याचे धाडस करणाऱ्यांचा अंत निश्चित आहे, अशी टीका पंतप्रधानांनी पाकिस्तानवर केली.

पंतप्रधानांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आणि ही केवळ लष्करी कारवाई नसून भारताच्या नीतिमत्ता आणि भावनांची सखोल अभिव्यक्ती असल्याचे वर्णन केले. ‘‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि मोदी शांत कसे बसू शकतात? जो कोणी आपल्या बहिणींच्या कपाळावरील ‘सिंदूर’ पुसण्याचे धाडस करेल, तो निश्चितच संपेल,’’ असे पंतप्रधान म्हणाले. मोदींविरुद्ध लढणे किती कठीण असेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. २६ मे २०१४ रोजी देशाच्या नागरिकांनी ‘प्रधानसेवक’ बनवताना दिलेल्या जबाबदारीचा हा एक भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी दाहोद येथे २४,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. देशातील पहिल्या ९,००० अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे तसेच २१,४०५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रोलिंग स्टॉक वर्कशॉपचे अनावरण त्यांनी केले. अहमदाबाद-वेरावळ वंदे भारत सेवा आणि वलसाड-दाहोद एक्सप्रेस गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

उपराष्ट्रपतींकडून सिंदूरचे कौतुक

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहलगाम हल्ल्याला अतिशय चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि जगभरात स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवाद कोणत्याही किमतीत खपवून घेतला जाणार नाही, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे एका कार्यक्रमात सांगितले. दहशवादाविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अशी होती की ज्यांनी आपल्या बहिणींचे कोट्यवधी सिंदूर पुसले आहेत, त्यांना या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार नाही आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरुद्ध संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेने एकजूट राहिला आहे, अशी प्रशंसा धनखड यांनी केली.

भारताने बहावलपूर, मुरीदके आणि इतर ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना अचूक बॉम्बस्फोटांद्वारे प्रत्युत्तर दिले आहे, ते जगाने मान्य केले आहे असेही धनखड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारतीय उत्पादनांना प्राधान्य द्या’

भारताचे ध्यये विकसित राष्ट्र बनणे असून जनतेने ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. होळी, दिवाळी, गणेशोत्सव या सणांमध्ये परदेशी वस्तूंऐवजी भारतीय उत्पादने वापरावी, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय सणांमध्ये फटाके, गणेशमूर्ती यांसारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या वापराबाबत पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले आणि आयात केलेल्या वस्तू थांबवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.