पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ सप्टेंबर) गुजरातच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान वडोदरा या ठिकाणी ‘नमो फॉर विकसित भारत’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देखील सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं.

‘नमो फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विविध विकासकामांसह महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. तसेच काँग्रसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे देशभरातील विविध शहरांत ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम घेत आहेत. मात्र, या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकीय रणकंदन सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आता पंतप्रधान मोदी यांनी वडोदरा येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला ‘झूठ की गुंज’, असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“‘झूठ की गूंज’ द्वारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे लोक प्रत्येक चौका-चौकात आढळतील. मात्र भारताची युवा पिढी सत्याच्या मार्गावर चालणारी आहे आणि तीच देशाचं भविष्य निश्चित करेल. भारताची युवाशक्ती सत्याच्या गर्जनेने प्रेरित होऊन पुढे जात आहे. ते सत्याच्या बळावर प्रगती करत आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत. सौर, पवन, जल किंवा अणुऊर्जा अशा सर्वच क्षेत्रांत सरकार ज्या निष्ठेने काम करत आहे, ते आज तरुणांना प्रत्यक्ष दिसत आहे. भारताचा तरुण सत्याच्या गर्जनेने प्रेरित होऊन पुढे जातो, सत्याच्या गर्जनेचा आधार घेत चालतो आणि सत्याच्या गर्जनेसाठीच कूच करतो”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.

‘नाराज फूफाजी’ म्हणत मोदींची राहुल गांधींवर टीका

“अलीकडेच जेएनपीटी (मुंबई) ते वडोदरा या दरम्यान ‘डबल-स्टॅक कंटेनर फ्रेट ट्रेन’ चालवण्यात आली. या एकाच फेरीत मुंबई ते वडोदरा या दरम्यान वाहून नेण्यात आलेल्या मालाचं प्रमाण २५० हून अधिक ट्रक्समधून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाइतकं होतं. आता तो ‘नाराज फुफा’ येईल आणि लगेचच तक्रार करायला सुरुवात करेल. ‘ट्रक चालकांचं काय? ट्रक कुठे जातील? ज्यांनी ट्रक विकत घेतले आहेत त्यांचं काय होईल?’ आता त्या ‘फुफा’ला टीका करण्यासाठी एक नवीन कारण मिळालं आहे”, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.