पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( ८ एप्रिल ) तेलंगणातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर बोलताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांच्यावर हल्लाबोल केला. तेलंगणातील नागरिकांना तुष्टीकरण, परिवारवाद आणि भ्रष्टाचाराशी लढायचे आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी केसीआर यांना लक्ष्य केले.
“देशात डिजिटल पद्धतीने पैशांची देवाणघेवाण वाढली आहे. हे यापूर्वी का झाले नाही? कारण परिवारवाद वाल्यांना व्यवस्थेवरील आपले नियंत्रण सोडायचे नव्हते. कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ किती मिळणार, यावरही त्यांना नियंत्रण ठेवायचे होते,” असे पंतप्रधानांनी सांगितलं.




हेही वाचा : “गौतम अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं”, शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“तेलंगणातील जनतेला तुष्टीकरण आणि भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागेल. केंद्राच्या प्रकल्पांमध्ये राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होत आहे. विकासकामे होत असल्याने काही लोक नाराज आहेत. या लोकांना प्रत्येक गोष्टीत आपल्या कुटुंबाची महत्वकांक्षा दिसते. त्यांना व्यवस्थेवर असलेले नियंत्रण सोडायचे नाही,” अशी अप्रत्यक्षपणे टीका पंतप्रधान मोदींनी केसीआर यांच्यावर केली.
हेही वाचा : कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार? शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले…
“तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही रेल्वे एक प्रकारे श्रद्धा, आधुनिकता आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. पण, केंद्राच्या प्रयत्नांमुळे होत असलेल्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य मिळत नाही, याचे मला दु:ख आहे. त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत आहे. राज्य सरकारने विकासकामांना आठकाठी न आणता प्रकल्पांना गती देण्यावर द्यावा,” अशी विनंती नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारला केली आहे.