PM Modi Gujarat Speech Iran War Opposition Attack: इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून देशात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. “देशावर संकट आले की काही लोकांना आनंद होतो,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. गुजरातमधील बनासकांठा येथे शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
इराण युद्धाच्या परिणामांना भारत सामूहिक प्रयत्नांतून तोंड देत असताना काही लोक खतांचा पुरवठा होणार नाही, स्वयंपाकाचा गॅस संपेल, अशा अफवा पसरवत असल्याचा दावा मोदी यांनी केला. यामुळे शेतकरी आणि महिलांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारच्या वक्तव्यांमागे देशात अस्वस्थता निर्माण करणे आणि सरकारची प्रतिमा मलिन करणे हा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“देश संकटाचा सामना करत असताना हे लोक त्यातही आनंद शोधतात. इराण युद्धाच्या परिणामांना भारत एकजुटीने सामोरे जात आहे. मात्र, खत मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना आणि स्वयंपाकाचा गॅस संपेल असे सांगून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असे मोदी म्हणाले. युद्धाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. खताचा पुरवठा सुरू असून ते सुमारे ३०० रुपयांना उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.
एमएसपी आणि पीएम-किसान योजनेचा उल्लेख
जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे सांगत, मागील सरकारांनी एमएसपीबाबत दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. गेल्या १२ वर्षांत गहू व भात उत्पादकांना एमएसपीद्वारे सुमारे २४ लाख कोटी रुपये देण्यात आले असून, पीएम-किसान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ४.५ लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील ८५ टक्क्यांहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणाला आणि विकासाला आपल्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले.
गुजरातमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी बनासकांठा येथील रोड शो करून झाली असून, त्यांच्या हस्ते १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. यामध्ये गोवंश प्रजनन व जनुकीय सुधारणेसाठी १२७ एकरवर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘भारत बोव्हाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण आणि बनास डेअरीच्या दोन बायो-सीएनजी प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा समावेश आहे. कांकरेज गोवंशाच्या जातीसाठी समर्पित असलेले हे देशातील अशा प्रकारचे पहिले केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदाबाद मेट्रो आणि रस्ते विस्ताराचे प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार, विमानतळ आणि गिफ्ट सिटी मार्ग, २,६०० कोटी रुपये खर्चाच्या अहमदाबाद-महेसाणा महामार्गाचे चार पदरीवरून आठ पदरीकरण, ४,९५० कोटी रुपये खर्चाच्या कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण आणि ८०० कोटी रुपयांच्या बालस्नेही अंगणवाडी केंद्रांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे.
पीएम-किसानचा २४ वा हप्ता; दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता जारी करणार आहेत. या हप्त्यापोटी १९ हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. तसेच अहमदाबाद (साबरमती)-वाराणसी एक्स्प्रेस आणि महेसाणा-बेचाराजी-साबरमती मेमू रेल्वे सेवांना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
