पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी बंगळुरूमध्ये एक मोठी आणि धक्कादायक सुरक्षा त्रुटी समोर आली. पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी राखीव असलेल्या महामार्गावर जिलेटीनच्या कांड्या आणि काही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत एका उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.
नेमकी घटना काय?
बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील वाडेरहल्ली गेटजवळ १० मे रोजी ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ फाउंडेशनच्या आश्रमातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यांच्या आगमनाच्या अवघ्या काही तास आधी, सकाळी ९ च्या सुमारास एका हाय-सिक्युरिटी पेट्रोलिंग करणाऱ्या कॉन्स्टेबलला कुप्पारेड्डी तलावाजवळ, एका हॉटेलच्या शेजारी एक संशयास्पद पुठ्ठ्याचा बॉक्स दिसला.
संशय आल्याने स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ‘बॉम्ब शोधक व नाशक पथकाला’ (BDDS) बोलावण्यात आले. या बॉक्सची तपासणी केली असता, त्यात चिकटपट्ट्यांनी गुंडाळलेल्या जिलेटीनच्या कांड्या, बॅटऱ्या, वायर्स आणि एक कच्चे इलेक्ट्रॉनिक सर्किट आढळून आले.
बंगळुरू दक्षिणचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास गौडा यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एक सब-इन्स्पेक्टर, एक असिस्टंट सब-इन्स्पेक्टर आणि चार कॉन्स्टेबल अशा एकूण ६ जणांना निलंबित केले आहे. याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्तान टाइमस्’ ने प्रसिध्द केले आहे. घटनेनंतर संपूर्ण महामार्ग आणि परिसराची अत्यंत कडक तपासणी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच पंतप्रधानांचा ताफा तिथून रवाना झाला.
प्राथमिक अंदाजानुसार, हे साहित्य शेजारील खाणीतून टाकून दिलेले असण्याची शक्यता आहे. मात्र, सोबत वायर्स आणि सर्किट सापडल्याने घातपाताचा संशय बळावला असून तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
स्फोटाची क्षमता नव्हती, पण…
जप्त करण्यात आलेले साहित्य अपूर्ण होते. त्यात कोणताही टाइमर किंवा थेट स्फोट घडवून आणणारा ‘डेटोनेटर’ नव्हता. त्यामुळे या साहित्याचा वापर करून लगेच स्फोट करणे शक्य नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. केवळ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या असत्या, तर ती बेकायदेशीर वाहतूक किंवा खाणकामाशी संबंधित बाब वाटली असती. पण जेव्हा सोबत बॅटरी, वायर्स आणि सर्किट सापडतात, तेव्हा ‘आयईडी’ (IED) सारखा स्फोटक कट रचण्याचा प्रयत्न तर नव्हता ना, या दृष्टीने तपास करावाच लागतो,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पुढील तपास सुरू
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी इतकी कडक सुरक्षा असताना, हा बॉक्स तिथे आला कसा? हा केवळ सुरक्षेला घाबरवण्याचा प्रयत्न होता की आणखी काही? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांची चौकशी सुरू आहे.
