अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या संघर्षामुळे मध्य पूर्वेत अजूनही युद्धाचे ढग गडद आहेत. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये धगधगत असलेल्या युद्धाला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या संघर्षात वाढ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला या संघर्षामुळे अडथळे निर्माण होत आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. पश्चिम आशियात असणाऱ्या या तणावाचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. या घडामोडी सुरू असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरून पश्चिम आशियातील तणावावर आणि भारत व इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

नेतान्याहू आणि मोदी यांच्यात काय चर्चा झाली?

पंतप्रधान नेतान्याहू यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी नेतान्याहू आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायलमध्ये विशेष धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही देशांच्या हितासाठी विविध क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच पश्चिम आशियातील तणावावरही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात काय म्हटलं?

“दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल विशेष धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला”, असं पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.

इराणशी पुन्हा युद्ध की शांतता? ट्रम्प अन् नेतान्याहूंमध्ये काय ठरलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे. इराण युद्धावर तोडगा काढायचा की पुन्हा युद्ध? यावर ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात तब्बल ९० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सांगितली जाते. या बैठकीत इराण युद्धाबाबत तीन पर्याय काढण्यात आल्याचंही बोललं जातं.

इराणबाबत तीन पर्यांवर चर्चा

‘ॲक्सिओस’च्या एका वृत्तानुसार, पहिला पर्याय म्हणजे इराणबरोबर वाटाघाटींद्वारे करार करणं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.

दुसरा पर्याय म्हणजे इराणभोवती नौदलाची नाकेबंदी कायम ठेवणं आणि अतिरिक्त उपाययोजनांद्वारे आर्थिक दबाव आणखी वाढवणं.

तिसरा पर्याय म्हणजे शांतता राखण्यासाठी मुत्सद्देगिरी करणं आणि निर्बंध लादणं. तरीही अपयश आल्यास लष्करी हल्ले पुन्हा सुरू करणं, या पर्याबाबत ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.