पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी हे आते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग सत्तेवर राहणारे ‘नियुक्त आणि निवडून आलेले’ पंतप्रधान बनले आहेत. या ऐतिहासिक कामागिरीबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष अभिनंदन केले आहे.

४,३९९ दिवसांचा नवा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयात सलग ४,३९९ दिवस पूर्ण केले आहेत. २०१४ मध्ये पहिल्यांदा देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंत सातत्याने या पदावर कार्यरत आहेत. या दीर्घ आणि सलग कार्यकाळामुळे त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या सलग पंतप्रधानपदाचा विक्रम मागे टाकला आहे.

मेलोनी यांची ‘X’ वरून खास पोस्ट

सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेत असतात. मेलोनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत मोदींचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आज ते भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत.”

रोममधील भेटीची आठवण

आपल्या पोस्टमध्ये मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या इटली दौऱ्याचाही उल्लेख केला. काही आठवड्यांपूर्वीच दोन्ही नेत्यांची रोममध्ये भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आणि सहकार्याची एक नवीन चौकट निश्चित करण्यात आली.

मेलोनी पुढे म्हणाल्या, “काही आठवड्यांपूर्वी रोममध्ये पुन्हा भेटणे आणि एकत्र मिळून ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’ सुरू करणे हा एक उत्तम अनुभव होता. ही भागीदारी आपल्या दोन्ही देशांच्या आणि जनतेच्या भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करेल.”

इंटरनेटवर गाजलेली ‘मेलॉडी’ (Melodi) केमिस्ट्री

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीमुळे इंटरनेटवर ‘मेलॉडी’ (Melodi) हा शब्द प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मे महिन्यात झालेल्या इटली दौऱ्यात या संदर्भात एक अतिशय मजेशीर आणि हलका-फुलका प्रसंग पाहायला मिळाला होता.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘मेलोडी’ (Melody) चॉकलेटचे पाकीट भेट दिले होते. सोशल मीडियावरील ‘मेलॉडी’ या नावाला दिलेली ही एक मजेशीर दाद होती, ज्याची जगभरात चर्चा झाली. मेलोनी यांच्या या ताज्या संदेशामुळे भारत आणि इटली यांच्यातील राजनैतिक संबंध किती घट्ट आणि सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.