दादरी प्रकरणातील मौन सोडले
विविधता, सहिष्णुता आणि संयम या मूल्यांची कसोशीने जपणूक करताना हिंदूू आणि मुस्लिमांनी आपापसात नव्हे तर गरिबीशी संघटितपणे लढावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केले. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दादरी येथे एका मुस्लीम नागरिकाची जमावाने हत्या केली होती. त्याबाबत गेले अकरा दिवस बाळगलेले मौन या निमित्ताने मोदी यांनी सोडले.

दादरी घटनेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी बुधवारी विविधता, सहिष्णुता आणि संयम या मूलभूत तत्त्वांची समाजाने जपणूक करावी, असे आवाहन केले होते. या तत्त्वांमुळेच देशाचे ऐक्य आणि लोकशाही टिकून आहे, याचीही जाणीव राष्ट्रपतींनी करून दिली होती. तो धागा पकडून दादरीबाबतचे आपले मौन सोडताना मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींनी जे आवाहन केले ते सदोदित लक्षात ठेवले पाहिजे. मी यापूर्वीही म्हणालो होतो की, मुसलमानांशी लढायचे की गरिबीशी लढायचे, हे हिंदूंनी कायमचे ठरवून टाकावे. हिंदूंशी लढायचे की गरिबीशी लढायचे, याचा सोक्षमोक्ष मुस्लीम बांधवांनी लावावा. हिंदू आणि मुस्लीम जेव्हा संघटितपणे गरिबीविरोधात लढतील आणि तिला पराभूत करतील तेव्हा देशाचाच फायदा होईल आणि देशाचे ऐक्य बळकट राहील.

द्वेषाच्या राजकारणाने नव्हे तर ऐक्य, धार्मिक सौहार्द, बंधुत्व आणि शांतता या तत्त्वांच्या आधारावरच देशाची प्रगती होईल, असेही मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी बुधवारी जो संदेश दिला त्याच्या इतका प्रेरक, दिशादर्शक आणि महत्त्वाचा संदेश दुसरा नाही. तो आचरणात आणला तरच जगाच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या आपण पूर्ण करू शकू, असेही त्यांनी सांगितले.
दादरी प्रकरणानंतर भाजपचे मंत्री महेश शर्मा, संजीव बलयान आणि साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ आदी काही नेत्यांनी बेताल वक्तव्ये केली होती. त्याबद्दलही मोदी यांनी मौन बाळगल्याने टीका होत होती. त्यामुळे, काही नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन मोदी यांनी या सभेत केले.

राजकीय संधिसाधूपणासाठी बेजबाबदार वक्तव्ये करण्याची सवय नेत्यांनी सोडून द्यायला हवी. मी जनतेला सांगू इच्छितो की काही अल्प कुवतीचे नेते अशी बेजबाबदार वक्तव्ये करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्या वक्तव्यांना किंमत देऊ नका. मग भले ती वक्तव्ये मीदेखील का केली असेनात! नरेंद्र मोदी</strong>

नीतिश यांचा टोला कामी!
‘हिंदूसुद्धा गोमांस खातात,’ या लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर मोदी यांनी मुंगेर, बेगुसराय आणि समस्तिपूरच्या सभेत टीकास्त्र सोडले होते. पण लालूप्रसाद यांचे वक्तव्य ज्या दादरी घटनेबाबत होते, त्याबद्दल मात्र मोदी यांनी मौन पाळले होते. नितीशकुमार यांनी या विसंगतीवर बोट ठेवल्यानंतरच मोदी यांचे मौन सुटले आहे!

ही तर मूळ मुद्दय़ाला बगल : काँग्रेस</strong>
हिंदूू आणि मुस्लिमांना गरिबीशी लढायला सांगून मूळ मुद्दय़ाला पंतप्रधान मोदी यांनी बगलच दिली आहे, असा टोला काँग्रेसने हाणला आहे. मोदी यांनी दादरी घटनेचा किंवा आपल्या पक्षाच्या बेताल नेत्यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही, असे काँग्रेस प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी सांगितले.

सीबीआय चौकशीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली दादरी घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी केली.

खान यांच्याविरुद्ध तक्रार
दादरी घटना संयुक्त राष्ट्रांकडे नेल्यावरून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध दिल्लीतील भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खान जातीय सलोखा बिघडवत असून हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ते देशाशी बेईमानी करीत आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे.