PM Modi BRICS Business Forum Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’ला संबोधित केले. “जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सागरी वाहतुक आणि खलाशी यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक व्यापारासाठी सुरक्षित पुरवठा साखळी देखील आवश्यक आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

ब्रिक्स देशांचा एकत्रित जीडीपी जवळपास ४.५ पटीने वाढला – पंतप्रधान मोदी

“ब्रिक्स देश जगातील ५० टक्के लोकसंख्या, जागतिक जीडीपीच्या ४० टक्के आणि जागतिक व्यापाराच्या २५ टक्क्यांहून अधिक भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक बनली आहे. ब्रिक्स देशांचा एकत्रित जीडीपी जवळपास ४.५ पटीने वाढला आहे. या तुलनेत जागतिक जीडीपीची वाढ साधारण २.५ पट झालीय. ब्रिक्स देशांची आर्थिक ताकद उर्वरित जगाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले.

इनोव्हेशनवर भाष्य

पंतप्रधान मोदींनी इनोव्हेशन केंद्र म्हणून ब्रिक्स देशांच्या वाढत्या भूमिकेवरही भर दिला. “तळागाळातील उपक्रमांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांत नवनवीन उपाय समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या यजमानपदाखाली पार पडणारा हा मंच आजवरचा सर्वात मोठा ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’ असल्याचे मोदींनी सांगितले. “ब्रिक्सचा वाढता विस्तार आणि आर्थिक ताकद सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“व्यवसायांमधील अडथळे कमी करणे आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यावर आमचा भर आहे. आमच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली, आम्ही कृषी, आरोग्य, कौशल्य आणि स्मार्ट ग्रीड्स यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन सहकार्याचे जाळे निर्माण केलंय. स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना बाजारपेठ आणि फायनान्सशी जोडण्यासाठी आम्ही ‘ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क’, ‘ब्रिक्स एमएसएमई पोर्टल’ आणि ‘ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड’ यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत”, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. भारत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा यजमान आहे. भारताचे अध्यक्षपद “बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबिलिटी” या संकल्पनेवर आधारित आहे.