PM Modi BRICS Photo Viral moment : ब्रिक्स परिषदेसाठी या समूहातील नेते भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर विविध देशांचं शिष्टमंडळ आणि अनेक अधिकारीही भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नवी दिल्लीतील ‘ब्रिक्स बिझनेस फोरम’ मध्ये एका अनौपचारिक फोटोच्या निमित्ताने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. काही परदेशी प्रतिनिधींच्या एका गटाने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांना विनंती केली. महत्त्वाचं म्हणजे, आपल्या व्यस्त दिनक्रमातही त्यांनी या प्रतिनिधींना फोटो काढण्यासाठी वेळ दिला.

भारत सरकारने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, परदेशी प्रतिनिधी पंतप्रधानांकडे जाताना आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करताना दिसत आहेत. “आम्ही एक फोटो काढू शकतो का?” असं एका प्रतिनिधीने विचारलं. त्यावर पंतप्रधान मोदींनी “हो, नक्कीच”, असं उत्तर देत त्या प्रतिनिधीसोबत फोटो काढला. त्यानंतर लगेचच, आसपासचे इतर प्रतिनिधी देखील “कृपया, पंतप्रधान मोदी”, अशी विनंती करताना ऐकू आले. त्यांची विनंती मानत पंतप्रधान त्या प्रतिनिधींच्या गटाकडे फोटोसाठी पुढे सरकले.

प्रतिनिधी एकत्र येत असताना, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पंतप्रधान मोदींच्या भोवती असलेल्या या गटाला जागा देण्यासाठी बाजूला सरकताना दिसले. सर्वजण फोटोसाठी योग्य स्थितीत येईपर्यंत पंतप्रधानांनी प्रतिनिधींना काही क्षण थांबण्यास सांगितलं. या अनौपचारिक संभाषणादरम्यान एक हलका-फुलका क्षण तेव्हा आला, जेव्हा फोटो काढणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटलं, “तुम्ही सर्व महिला खूप नशीबवान आहात.” यावर त्या गटात एकच हशा पिकला आणि त्यांनी उत्तर दिले, “आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत.” हा संक्षिप्त संवाद संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थँक्यू म्हटलं.

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी उच्च-स्तरीय राजनैतिक आणि व्यावसायिक व्यस्ततेने भरलेल्या ब्रिक्स परिषदेच्या (BRICS Summit) दिवसात या उत्स्फूर्त संवादाने एक हलका-फुलका क्षण निर्माण केला. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित केले आणि पुतिन व पेझेश्कियान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.

भारत १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन करत आहे, ज्यामध्ये या विस्तारित गटाचे नेते आणि प्रतिनिधी एकत्र आले आहेत.