पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या थलतेज ते वस्त्रल या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना मेट्रोचे काम कसे चालते याबाबत प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. मेट्रो रेल्वेच्या कामांबाबत माहिती झाल्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना विद्यार्थ्यांना संकोच वाटेल, असे मोदी म्हणाले आहेत.

विमानाने प्रवास करणाऱ्यांनी एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला तर..; पंतप्रधान मोदींचा दावा

“नववी ते बारावी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या कामांबाबत विचारले पाहिजे. त्यासाठी लागणारा खर्च, बोगद्यांचे बांधकाम याविषयी त्यांना प्रश्न पडले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान तर राहणारच शिवाय सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सहभाग घेणार नाहीत. अशाप्रकारे नुकसान झाल्यास स्वत:च्या मालमत्तेचे नुकसान झाल्यासारखा त्यांना त्रास होईल”, असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांच्या विकासाच्या मॉडेलचे कौतुक केले. आत्तापर्यंत लोक न्यूयॉर्क, न्यूजर्सीबाबत बोलायचे. मात्र, आता या शर्यतीत माझा भारत देशदेखील मागे नाही, असे गौरवोद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालूपूर स्थानकात मेट्रो प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम कॉरिडोरचेही शुक्रवारी उद्घाटन केले. या स्थानकात मोदी आजपासून सुरू झालेल्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने पोहोचले होते. या एक्स्प्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.