फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. जवळपास २० वर्षांनंतर पहिल्यांदाच फ्रान्समध्ये विद्यमान अध्यक्षाला जनतेने पुन्हा निवडून दिले आहे. मॅक्रॉन यांच्या प्रतिस्पर्धी नॅशनल रॅली आघाडीच्या मारी ला पेन यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पराभव झाला असून त्यांच्यासाठी हा तिसरा पराभव ठरलाय. ‘रिपब्लिक ऑन द मूव्ह’ आघाडीचे मॅक्रॉन यांना ५८ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली, तर मारी ला पेन यांना जवळपास ४२ टक्के मते मिळाली. या विजयानंतर मॅक्रॉन यांनी धोरणात्मक बदलांचे संकेत आपल्या विजयी भाषणामधून देताना समानतेच्या आधारावर काही निर्णय घेतले जातील असं स्पष्ट केलंय. मॅक्रॉन यांच्या विजयानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मॅक्रॉन यांच्या विजयानंतर एक विशेष ट्विट केलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : फ्रान्सच्या अध्यक्षपदी पुन्हा मॅक्रॉन… लोकशाहीवादी का व्यक्त करताहेत समाधान?

पंतप्रधान मोदींनी भारतीय वेळेनुसार, सोमवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी मॅक्रॉन यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलंय. यामध्ये त्यांनी मॅक्रॉन यांना टॅगही केलं आहे. “माझे मित्र इमान्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. भारत-फ्रान्सदरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मी तुमच्यासोबत एकत्र काम करत राहण्यासाठी फार उत्सुक आहे,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मॅक्रॉन हे पत्नी ब्रिगिट आणि मुलांसहीत आयफेल टॉवरजवळ चॅम्प डे मार्स येथे उभारण्यात आलेल्या मंचावर भाषण देण्यासाठी पोहोचले. त्यांनी तिथं राष्ट्रगीत म्हटलं. त्यानंतर लोकांना संबोधित करताना मॅक्रॉन यांनी, “मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. असा समाज तिथे महिला आणि पुरुषांमध्ये समानता असेल. येणारी काही वर्ष नक्कीच कठीण असतील. मात्र ती ऐतिहासिक असतील. नवीन पिढ्यांसाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागणार आहे,” असं मॅक्रॉन म्हणाले.

या निवडणुकीचा भारत-फ्रान्स संबंधांवर काय परिणाम होईल?

मॅक्रॉन यांच्या फेरनिवडणुकीमुळे परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. सांस्कृतिक, व्यापारी आणि सामरिक हे भारत-फ्रान्स संबंधांचे त्रिस्तरीय स्वरूप पुढेही कायम राहील. फ्रान्समध्ये भारताच्या मैत्रीविषयीचे धोरण बऱ्यापैकी पक्षातीत आहे. भारतीय कौशल्यधारी रोजंदारांचे फ्रान्समध्ये जाण्याचे प्रमाण लक्षणीय नसल्यामुळे मारी ला पेन यांच्यासारख्यांकडूनही या संबंधांना फार झळ पोहोचण्याची शक्यता नाही.