PM Narendra Modi attacks Congress over alliance with TVK : तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाने इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून मंत्रिमंडळातील ८ जणांनीही यावेळी शपथ घेतली. या शपथविधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले असून केंद्र सरकार राज्याच्या विकासासाठी कायम सहकार्य करेल, असं आश्वासन दिलं. दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. काँग्रेस धोकेबाज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते कर्नाटकातील कार्यक्रमात बोलत होते.
राजकीय वारे बदलताच काँग्रेसने दगा दिला
“सध्या तामिळनाडूतील परिस्थिती बघा. २५-३० वर्षे काँग्रेसचे द्रमुकसोबत घनिष्ठ संबंध होते. वेळोवेळी द्रमुकसोबतच्या युतीने काँग्रेसला संकटातून बाहेर काढले आहे. खरं तर, २०१४ पूर्वी १० वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार मोठ्या प्रमाणावर द्रमुकमुळेच टिकले. तरीही, जी द्रमुक काँग्रेसच्या भल्यासाठी सातत्याने काम करत होती, त्याच पक्षाला राजकीय वारे बदलताच काँग्रेसने दगा दिला”, असं पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसने पाठित खंजीर खुपसला
“सत्तेच्या लालसेपोटी, सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राजकीयदृष्ट्या टिकून राहण्यासाठी काँग्रेसला आणखी एका पक्षाची गरज आहे, ज्याच्या पाठीवर स्वार होऊन ती पुढे जाऊ शकेल”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
विजय यांच्या नऊ मंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी नेते असून त्यात टीव्हीके प्रमुखांच्या मुख्य गटालाही स्थान मिळाले आहे. परंतु, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संख्याबळाची गरज असताना टीव्हीकेला पाठिंबा देण्यास तयार झालेल्या पहिल्या पक्षांपैकी एक असलेल्या राहुल गांधींच्या काँग्रेसच्या एकाही नेत्याला नव्या तामिळनाडू मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रचाराच्या काळातच काँग्रेस पक्ष विजयवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना तमिळनाडूच्या राजकारणात विजय यशस्वी होईल यावर खूप विश्वास होता, इतका की निवडणुकीपूर्वी डीएमकेने बोलावलेल्या अनेक सभांना काँग्रेसने हजेरी लावली नव्हती.
मुख्यमंत्री पदी जोसेफ विजय
टीव्हीके या पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा करीश्मा दाखवत १०८ जागा जिंकल्या. तमिळनाडूमध्ये पन्नास वर्षांपासून असलेली डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांना पर्याय म्हणून जोसेफ विजय यांचा टीव्हीके पक्ष उभा राहिला आहे. या पक्षाला बहुमत गाठता आलं नव्हतं. दरम्यान आता १२१ सदस्यांचा पाठिंबा असल्याचं पत्र विजय यांनी राज्यपालांना दिलं. ज्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री या पदावर जोसेफ विजय विराजमान झाले आहेत.
