नवी दिल्ली : ‘चार मोठी राज्ये; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक. या मोठ्या राज्यांतील विधान परिषदेच्या २८ जागांसाठी निवडणूक. मतदानही मतपत्रिकेद्वारे झाले. अंदाज लावा, काँग्रेसने किती जागा जिंकल्या,’ असा उपरोधिक सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसची खिल्ली उडवली. चार राज्यांतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांत, विशेषत: सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. देशभरातील  २८ जागांपैकी एक अपवाद वगळता काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या निवडणुकीत फेरफार होत असल्याच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांद्वारे नव्हे तर मतपत्रिकेद्वारेच मतदान झाले होते. तरीही काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव अप्रत्यक्ष झाल्याची टीका मोदींनी ‘एक्स’वरून केली. चार राज्यांतील २८ जागांपैकी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून कर्नाटकमधील चारही जागांवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला.   

वाराणसीतील शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाने विजय मिळवत भाजपला धक्का दिला. आग्रा शिक्षक मतदारसंघातही ‘सप’ने बाजी मारली. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील २८ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान झाले. बुधवारी जाहीर झालेल्या निकालानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ४ तर ‘सप’ने २ जागा जिंकल्या. भाजप आणि मित्रपक्षांनी कर्नाटकात चारही जागा जिंकल्या. तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने भाजपचा पराभव केला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानेही विधान परिषदेत प्रवेश केला. बिहारमध्ये भाजपने ४ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या. 

‘जनसुराज’चा विधान परिषदेत प्रवेश

* बिहारमधील आठ जागांच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना धक्के बसले. दरभंगा शिक्षक मतदारसंघात जनसुराजचे सुरेश प्रसाद राय यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य आणि बिहार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांचा ३२४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे जनसुराजने विधान परिषदेत प्रथमच प्रवेश केला.

* पाटणा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे डॉ. संजीव कुमार यांनी भाजपचे पाच वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले नवल किशोर यादव यांचा पराभव केला. तिरहुत शिक्षक मतदारसंघात भाजपचे नरेंद्र प्रसाद सिंह विजयी झाले, तर सारण शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार राहुल राज यांनी विजय मिळवला.

* प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने सर्व आठ जागांवर उमेदवार उभे केले होते. बिहारमध्ये राजद, भाजप, जनसुराज आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेले यश हे निवडणुकीतील बहुरंगी लढतीचे वैशिष्ट्य ठरले.ं

पंतप्रधानांच्या मतदारसंघात भाजपला धक्का

वाराणसी आणि आग्रा शिक्षक मतदारसंघांत समाजवादी पक्षाने बाजी मारली. वाराणसी शिक्षक मतदारसंघातून ‘सप’चे लाल बिहारी यादव विजयी झाले. आग्रा शिक्षक मतदारसंघात ‘सप’चे आकाश अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ‘सप’ला मिळालेला विजय भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेशात भाजपची आघाडी

उत्तर प्रदेशातील ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात प्रमुख लढत झाली. सहा जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यापैकी भाजपने चार, तर सपने दोन जागा जिंकल्या. भाजपने मेरठ पदवीधर, मेरठ शिक्षक, लखनऊ शिक्षक आणि बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघांत विजय मिळवला.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमध्ये विधान परिषदेच्या २८ जागांवर निवडणूक झाली. मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. काँग्रेसने किती जागा जिंकल्या? याचा अंदाज लावा.   – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कर्नाटकात भाजप-जनता दलाचे वर्चस्व

कर्नाटकातील चारही जागा भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) यांच्या युतीने जिंकल्या. भाजपने तीन, तर ‘जेडीएस’ने एक जागा जिंकली. बेंगळूरु शिक्षक मतदारसंघात ‘जेडीएस’चे ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान सदस्य पुट्टण्णा यांचा ९०८ मतांनी पराभव केला. ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे शशिल जी. नमोशी यांनी काँग्रेसचे शरणप्पा मत्तूर यांना पराभूत केले.

दक्षिण-पूर्व पदवीधर मतदारसंघात भाजपचे के. एम. सुरेश यांनी विजय मिळवला, तर पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे एस. व्ही. संकनूर विजयी झाले. कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसला चारही जागांवर पराभव स्वीकारावा लागल्याने भाजप-जेडीएस युतीला बळ मिळाले आहे. 

‘विधान परिषद निकाल राष्ट्रवादीसाठी गंभीर इशारा’

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे पाच जागांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार) गंभीर इशारा आहे. जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी, पक्षाची प्राथमिकता नव्याने निश्चित करण्यासाठी आणि संघटनात्मक रचनेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सखोल आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षनेतृत्वाचे कान टोचले.

‘आत्मपरीक्षण होईल’ निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पक्षाची कामागिरी खराब झाल्याचे मान्य केले व आत्मपरीक्षण केले जाईल, असे ते म्हणाले.