PM Modi highlights Nehru’s historical stance against Somnath Temple restoration : गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर झालेल्या उद्घाटनाला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट घेऊन महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेशीही संवाद साधला. सोमनाथ मंदिराला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध दर्शवला होता, मात्र, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रयत्नांमुळे या मंदिराचा जिर्णोद्धार होऊ शकला, असं पंतप्रधान मोदी आज म्हणाले.

राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मुद्द्यावंर राजकारण झाले

“देशाची ओळख आणि स्वाभिमानाशी निगडित असलेल्या अनेक स्थळांचा परकीय आक्रमकांनी इतिहासात विध्वंस केला. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्या त्या देशांतील नागरिकांनी एकत्र येत आपली ओळख आणि राष्ट्रीय गौरव पुन्हा प्रस्थापित केला. पण भारतात मात्र राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवरही राजकारण करण्यात आले, अशी टीका मोदींनी केली.

सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता

सोमनाथ मंदिराचा उल्लेख करताना, स्वातंत्र्यानंतर देशाने हाती घेतलेल्या पहिल्या मोठ्या कामांपैकी एक म्हणजे सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माण असल्याचे सांगण्यात आले. यासाठी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून मोठा विरोध झाला होता, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसंच, सरदार पटेल यांच्या ठाम भूमिकेमुळेच तीव्र विरोध असूनही सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार झाला आणि शतकानुशतके लागलेला कलंक देशाने पुसून टाकला, असंही त्यांनी पुढे नमूद केलं.

वारसा आणि विकास घेऊन पुढे जायला हवं

“दुर्दैवाने, आजही आपल्या देशात अशा काही शक्ती सक्रिय आहेत ज्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाला अधिक महत्त्व देतात. राम मंदिराच्या उभारणीसारख्या प्रसंगीही आपण हे पाहिले आहे. राम मंदिराच्या बांधकामालादेखील कशाप्रकारे विरोध झाला, हे आपण अनुभवले आहे. अशा मानसिकतेविरोधात आपण सतर्क राहिले पाहिजे. विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन आपण पुढे गेले पाहिजे”, असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.