पंतप्रधानांच्या हस्ते देशाला समर्पित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी मंगळवारी पिकांच्या ३५ नवीन प्रजाती कृषी क्षेत्रातील वापरासाठी खुल्या केल्या असून त्या केंद्रीय कृषी संशोधन परिषदेने तयार केलेल्या आहेत. हवामान बदल व कुपोषण या दोन आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या तयार करण्यात आल्या.

या पिकांच्या प्रजाती आभासी कार्यक्रमात  देशाला समर्पित करण्यात आल्या. सर्व कृषी संशोधन परिषदा, राज्य व केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी केंद्रे यांचा हा कार्यक्रम होता.

पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, पिकांच्या ३५ विशेष जाती वापरासाठी जारी करण्यात आल्या असून त्यात हवामान बदल व पोषणमूल्यांचा विचार करण्यात आला आहे. या प्रजाती २०२१ मध्ये विकसित करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, देशातील ८६ टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. त्यांचे उत्पन्न यातून वाढणार आहे. शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहू नये. स्वत:च्या शक्तीवर उभे रहावे अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यासाठी पंतप्रधान किसान योजना, वाहतूक सुविधा, किसान रेल यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

रायपूर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटिक स्ट्रेस टॉलरन्स या संस्थेचे उद्घाटन केल्याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. हवामान बदलाचा धोका कायम आहे. त्याचा जगात परिणाम दिसून येत आहे. त्यातील एक  कारण नैसर्गिक असले तरी जमिनीतील कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे याचाही परिणाम होताना दिसत आहे. हवामान बदलांचा देशातील शेतीवर काय परिणाम होत आहे यावर संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, शोभा कंरदाळजे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यावेळी उपस्थित होते.

विविध पिकांचा समावेश पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी खुल्या केलेल्या पिकांच्या प्रजातींमध्ये चवळीची दुष्काळाला तोंड देऊ शकणारी प्रजाती, सोयाबीनची लवकर तयार होणारी प्रजाती, वाटाणा व तुरीची कीडप्रतिबंधक व बुरशीप्रतिरोधक प्रजाती, गहू, बाजरी, मका, क्विनोआ, तांदूळ, मका, विंगड बिन यांच्या प्रजातींचाही समावेश आहे.