PM Modi Dimaagi Naxals Warning : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केलं. विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी काही जणांवर प्रहारही केले. २०४७ चा विकसित भारताचा संकल्प, त्याकरता देशातील विकसाला प्राप्त झालेली गती याविषयी माहिती देत असताना त्यांनी देशातील दिमागी नक्षलवाद म्हणजेच वैचारिक नक्षलवादाला लक्ष्य केलं. या दिमागी नक्षलवादांना ओळखून त्यांना विलग केलं जाईल असा इशाराच त्यांनी आज लाल किल्ल्यावरून दिला. दरम्यान, दिमागी नक्षलवाद ही संज्ञा नेमकी कोणाबाबत वापरली, याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही.

“देशात सत्तेमध्ये माओवादी विचारसरणीचे लोक जागा अडवून बसले होते. सरकारी कमिटीमध्येही सल्लागाराच्या भूमिकेत या माओवादी लोकांनी प्रभावित केलं होतं. आम्ही जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या संकटातून मुक्त करण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, सशस्त्र नक्षलवादी संपले असले तरी दिमागी नक्षल अजूनही शिल्लक आहेत आणि ही मानसिकता बाळगणारे लोक संधीची वाट पाहत आहेत”, असं मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “हिंसा आणि अराजकतेसाठी ते मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते विविध डावपेच वापरत आहेत. आपण या दिमागी नक्षल्यांना ओळखलं पाहिजे. आपल्याला त्यांना वेगळं पाडण्याची आणि देशातील तरुणांना देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहातील प्रयत्नांशी जोडण्याची गरज आहे.”

उज्ज्वल भविष्यासाठी व्यसन मुक्त भारत करणे आवश्यक

“देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसन मुक्त भारत होणं गरजेचे आहे. मागच्या काही काळात स्वयंसेवी संस्था, अध्यात्मिक व्यक्ती, माय भारत स्वयंसेवक, सामाजिक संघटनांनी मिळून नशा मुक्त भारतासाठी १०० आठवड्यांचा कार्यक्रम आखला आहे. मी भारतातील सर्व कुटुंबाना आवाहन करेन की, तुम्हीही या अभियानात सहभागी व्हा आणि व्यसन मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करा”, असं मोदी म्हणाले.

ऑलिम्पिकसाठी आम्ही खेळाडूंचा शोध घेऊ – पंतप्रधान मोदी

“ऑलिम्पिक स्पर्धेतील अनेक खेळ असे आहेत, ज्यात भारताने आजवर सहभाग घेतलेला नाही. २०३६ मध्ये जर भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवायची असेल तर आपल्याला सर्व क्रीडा प्रकारात सहभाग घ्यावा लागेल. यासाठी आम्ही टॅलेंट हंटचे अभियान राबवणार आहोत. ५ ते १५ वर्ष वय असलेल्या मुलांमधील क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी गावपातळीपासून अभियान चालवले जाईल. मुलांमधील कौशल्य पाहून त्यांना देशपातळीवर खेळण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल”, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.