पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या ‘दिमागी नक्षल’ या उल्लेखावरून राजकीय वादाला तोंड फुटले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपण ‘दिमागी नक्षल’ असल्याचे सांगत मोदींवर टीका केली. त्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात नक्षलवाद का आणि कसा फोफावला, याचे उत्तर मिळाले. काँग्रेस ही ‘दिमागी नक्षल काँग्रेस’ झाली असल्याची टीका गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी केली.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदी यांनी देशाने जंगलांमधील सशस्त्र नक्षलवाद संपवण्यात यश मिळविल्याचे सांगितले होते. मात्र, ‘दिमागी नक्षल’ व्यवस्थेत खोलवर रुजले असून, धोरणांमध्ये फेरफार करून हिंसा आणि अराजकतेला खतपाणी घालण्याची संधी ते शोधत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चिदंबरम यांनी रविवारी, ‘मला दिमागी नक्षल असल्याचा अभिमान आहे’, असे म्हटले. चिदंबरम नोव्हेंबर २००८ ते जुलै २०१२ या कालावधीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री होते.

‘मी खरा देशभक्त असल्याने भाजपला घाबरत नाही’

दरम्यान, केजरीवाल यांनीही ‘दिमागी नक्षल’ या शब्दप्रयोगावरून मोदींना लक्ष्य केले. ‘मी दिमागी नक्षल असल्याचा अभिमान बाळगतो; कारण मी खरा देशभक्त असून भाजपला घाबरत नाही,’ असे ते म्हणाले. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना मोदी ‘दिमागी नक्षल’ म्हणत असतील, तर भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तरी त्यांनाही ‘दिमागी नक्षल’ म्हटले गेले असते, असा दावा केजरीवाल यांनी केला. ज्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणि सांडपाणी व्यवस्था व उत्तम रुग्णालयांसारख्या चांगल्या सुविधा हव्या आहेत, त्यांनाही मोदी ‘दिमागी नक्षल’ म्हणतील, अशी टीका त्यांनी केली.