अमेरिका-इराणमधील युद्धामुळे पश्चिम आशियात अद्यापही तणाव आहे. या तणावाचा जगावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक देशात इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच आता भारताने देखील अधिक सावध भूमिका घेत उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.

या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी जनतेला इंधन बचत करण्याचं आवाहन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी या आवाहनाची सुरूवात स्वत:पासून करण्याचा निर्णय घेत त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी करण्याचे निर्देश एसपीजीला (SPG) दिले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अधिकृतपणे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसपीजीला आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. याशिवाय अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी नवीन वाहने न खरेदी करता, ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांची एसपीजीने अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यासाठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांचा संदेश आमच्यासह सर्वांसाठी आहे. आम्ही काय करावं? याबद्दल विभागाकडून माहितीची आम्ही वाट पाहत आहोत. मात्र, प्रत्येक विभागाला स्वतःच्या उपाययोजना आखाव्या लागतील.”

पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केलं होतं?

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं होतं. इंधनाची बचत करणं आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

PM Modi reduces SPG convoy size

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, “आपण पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये मेट्रो आहेत, तिथे लोकांनी मेट्रोचा वापर केला पाहिजे. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होम या सारख्या उपाययोजनांची गरज आहे.”

पंतप्रधान मोदींनी कोणते आवाहने केले आहेत?

-शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या.
-वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा.
-सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा.
-पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा.
-स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा.
-रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा.
-स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा.
-वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा.

पंतप्रधानांना सुरक्षा कोण पुरवतं?

सन १९८५ पासून विशेष सुरक्षा दल (एसपीजी) पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. यामध्ये स्वत: पंतप्रधान, त्यांची मुले आणि त्यांच्या पालकांचा समावेश असतो. याशिवाय ‘एसपीजी’कडून माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षा पुरविण्यात येते.

एसपीजीची सुत्रे कोणाकडे असतात?

एसपीजीची सुत्रे महानिरीक्षक (आयजी) पदावरील अधिकाऱ्याकडे असतात. या पदावरील व्यक्तीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. एसपीजी केंद्रीय सचिवांच्या अधिकार कक्षेत येत असून सुरक्षा सचिव एसपीजीचे नेतृत्व करतात.

PM Modi reduces SPG convoy size

एसपीजी कमांडो कोण असतात?

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या निकटवर्तीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील कमांडो हे जगातील सर्वोत्तम सुसज्ज सुरक्षा कमांडोंपैकी एक मानले जातात. एसपीजी कमांडो अधिकारी नेतृत्व, व्यावसायिकता व जवळचे संरक्षण यांसाठी विशेष प्रशिक्षण घेतात. त्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण हे जगातील सर्वांत कठीण प्रशिक्षणांपैकी एक असंत. या गटाच्या स्थापनेपासून, एसपीजीने त्यांच्या संरक्षणाखाली असलेल्यांची सुरक्षा सुधारण्यासाठी त्यांच्या पद्धतींमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हा गट सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी इंटेलिजन्स ब्यूरो आणि विविध राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेश पोलीस दल यांच्याशी समन्वय साधून काम करीत असतो. या गटाची स्थापना १९८५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर करण्यात आली होती.

भारतात पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेमध्ये किती प्रकार असतात?

भारतात पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेमध्ये ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिली जाते.

कोणाला पुरवली जाते ही सुरक्षा?

देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्यासह देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरवली जाते.