पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात प्रवास करण्याचे किंवा पर्यटन करणे टाळावे, असे आवाहन केले होते. एका वृत्त संकेतस्थळाने याबद्दल वृत्तांकन करताना सरकार विदेश प्रवासावर कर लावण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. मात्र ही बाब खरी नसल्याचे स्वतः पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी रात्री पंतप्रधान मोदींनी या बातमीची पोस्ट शेअर करत त्यावर ही धादांत खोटी माहिती असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी रात्री एस्कवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. यात तसूभरही सत्य नाही. विदेशातील प्रवासावर निर्बंध आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
तसेच त्यांनी भारतीय नागरिकांसाठी व्यवसायात सुलभता आणि जीवनात सुलभता आणण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवरही जोर दिला.
पंतप्रधान मोदींच्या स्पष्टीकरणानंतर आता सदर वृत्त संकेतस्थळाने माफी मागितली असून आपले वृत्त मागे घेतले आहे. विदेशातील प्रवासावर संभाव्य निर्बंध आणि अतिरिक्त कराबाबत अफवा पसरू नये, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करत हे वृत्त नाकारले.
मध्यपूर्वेतील तणावामुळे अर्थव्यवस्थेवर येत असलेला तणाव आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सदर बातमीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. भारत कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. यामुळे भारतासह जगभरात इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

पंतप्रधान मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली. मध्यपूर्वेतील तणाव त्यातून विस्कळीत झालेला इंधन पुरवठा यावर भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीबरोबर सामरिक पेट्रोलियम साठ्यांसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, या नव्या करारामुळे ऊर्जा सहकार्य अधिक दृढ होईल आणि भारताकडे कच्च्या तेलाचा अधिक पुरवठा होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास
पंतप्रधान मोदींनी इंधन वाचवण्याचे आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर भाजपाचे नेते आणि विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालय, विधानभवन आणि वर्षा निवासस्थानापर्यंत दुचाकीवरून प्रवास केला. तसेच ताफ्यातील काही वाहने कमी केली.
यानंतर आता त्यांनी पुणे ते बंगळुरु असा इंडिगो विमान कंपनीच्या इकॉनॉमी क्लासने प्रवास केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
