M Modi Donald Trump Meeting during the G7 Summit France 2026 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-७ (G7) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. भारतीय बाजूने अद्याप या दोन्ही नेत्यांच्या भेटीला दुजोरा दिलेला नाही. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर रवाना झाले असून, या दौऱ्यात ते या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी-७ शिखर परिषद १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे होणार आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ट्रम्प या जागतिक शिखर परिषदेदरम्यान मध्य पूर्व देशांच्या नेत्यांचीही भेट घेतील आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबतच्या एका सत्रात सहभागी होतील. अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी करण्याच्या जवळ आलेले असतानाच, ट्रम्प या शिखर परिषदेत होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्याबाबत चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा होणार का?

जी-७ (G7) शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठकीत भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा होणार का, यावर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “मला वाटते की संभाव्य व्यापार कराराचा मुद्दा नक्कीच समोर येईल. आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला एका संयुक्त फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली आहे. आमची गेल्या वर्षभरात भारतीयांसोबत बरीच सखोल चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे एक पथक भारतात गेले होते. आमचे त्यांच्याशी सातत्याने संभाषण सुरू असते. या कराराबाबत आणखी प्रगती करता येईल का, हे पाहण्यासाठी मी स्वतः पुढील आठवड्यात भारताचा दौरा करणार आहे.”

अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक आर्थिक भागीदार

“अमेरिका आणि भारतामध्ये यापूर्वी कधीही व्यापार करार झालेला नाही. भारतातील अर्थव्यवस्थेबाबतचे काही नवीन दृष्टिकोन असे आहेत ज्यामुळे आमच्या कंपन्यांना तिथे व्यवसाय करणे कठीण जाते, त्यामुळे आम्ही त्यातील काही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला वाटते की अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक आर्थिक भागीदार आहेत आणि ते एकमेकांच्या प्रगतीत मोठी भर घालू शकतात. ऊर्जा, औद्योगिक उत्पादने आणि काही विशिष्ट कृषी उत्पादनांच्या बाबतीत अमेरिकेने भारताला विक्री करण्यासारखे बरेच काही आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे भारताच्या भूमिकेबाबत आणि अमेरिका-भारत संबंधांच्या महत्त्वाबाबत खूप महत्त्वाकांक्षी आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. संभाव्य व्यापार करार हा देखील त्याचाच एक भाग आहे, असे आम्हाला वाटते”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जी-७ परिषदेत या करारावर अंतिम शिक्कामोर्तब करणार नाही

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दृष्टिकोन नेहमीच असा असतो की जोपर्यंत करार अत्यंत फायदेशीर होत नाही, तोपर्यंत आम्ही तो करत नाही. पण एक उत्तम करार होणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही जी-७ परिषदेत या करारावर अंतिम शिक्कामोर्तब करणार नाही. आम्हाला अजून काही तांत्रिक चर्चा पूर्ण करायच्या आहेत, परंतु दोन्ही नेत्यांना या विषयावर चर्चा करण्याची, सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्याची आणि आगामी आठवड्यात करार पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते किती उत्सुक आहेत हे ठरवण्याची एक चांगली संधी या माध्यमातून मिळेल”, असं ते म्हणाले.

जी-७ शिखर परिषद आणि फ्रान्स दौऱ्यावर पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-७ शिखर परिषदेतील भारताचा सहभाग हा भागीदार देशांनी भारतावर दाखवलेला विश्वास आणि देशाची वाढती जागतिक प्रतिमा दर्शवतो. “भारताला जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्याची ही सलग आठवी वेळ आहे. जी-७ मध्ये भारत केवळ स्वतःसाठीच बोलणार नाही, तर ग्लोबल साऊथच्या आकांक्षांनाही आवाज देईल”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या फ्रान्स दौऱ्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात फ्रान्सला एक विशेष स्थान आहे. तर स्लोव्हाकियाचा दौरा हा एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे द्विपक्षीय संबंधांना अधिक गती मिळेल.” भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात फ्रान्सला विशेष स्थान आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताला भेट दिली होती आणि आम्ही आमचे संबंध ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’पर्यंत उंचावले आहेत”, असं ते म्हणाले.