अमेरिकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वी एका नव्या कायद्याला मंजुरी मिळाली. अमेरिकेच्या संसदेत मंजूर झालेल्या नव्या कायद्यात रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याची तरतूद आहे. त्यामुळे भारत आणि चीन या सारख्या देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण हे दोन्ही देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च तेल खरेदी करतात. त्यामुळे चीन किंवा भारतावर अमेरिका कधीही १०० टक्के टॅरिफ लादू शकते.
अमेरिकेकडून भारतावर १०० टक्के टॅरिफचा धोका असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आज (३० सप्टेंबर) फोनवरुन विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर महत्वाची चर्चा झाली आहे. आम्ही व्यापार, संरक्षण, ऊर्जा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमधील आमच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आहे. आमची ‘सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी’ पुढे नेण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे”, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी सांगितली आहे.
तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आणि होर्मुझच्य सामुद्रधुनीमधील तणाव व त्यामुळे जागतिक व्यापाराला होणारे अडचणी याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादाबाबत पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, “जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांसह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही आम्ही विचार-विनिमय केला आहे.”
मोदी आणि ट्रम्प यांच्यात वर्षभरात चौथ्यांदा संवाद
पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील या वर्षात हा चौथ्यांदा दूरध्वनीवरून संवाद झाला आहे. याआधी या दोन्ही नेत्यांनी २ फेब्रुवारी, २४ मार्च आणि १४ एप्रिल रोजी अशा प्रकारे तीनदा दूरध्वनीवरून संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील गेल्या तीन संभाषणांमध्ये प्रामुख्याने भारत-अमेरिका व्यापार, द्विपक्षीय संबंध आणि पश्चिम आशियातील परिस्थिती यावर चर्चा झाली होती.
२ फेब्रुवारी रोजी झालेल्या संभाषणात भारतीय उत्पादनांवरील अमेरिकन आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या निर्णयाबद्दल मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले होते आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली होती.
तसेच २४ मार्च रोजी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील तणाव कमी करणे, लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करणे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्ट्रेट ऑफ होर्मुझला खुले, सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा केली होती. तसेच १४ एप्रिल रोजी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला होता आणि सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतची आपली कटिबद्धता अधोरेखित केली होती.
