पीटीआय, नवी दिल्ली
भारत पश्चिम आशियातील तणाव कमी करून शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे समर्थन करत असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बाेलताना मांडली. या संदर्भात त्यांचा ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला.

या चर्चेत सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचे संरक्षण आणि ती खुली ठेवण्यावर भर देण्यात आला. ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना पश्चिम आशियातील परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. भारत तणाव कमी करून शांतता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी समर्थन देतो. होर्मूझ सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणे जगासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्नांबाबत आम्ही संपर्कात राहण्याचे ठरवले आहे, असे मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली आणि होर्मूझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केल्याचे भारतातील अमेरिकेचे दूत सर्जियो गोर यांनी नमूद केले.