PM Modi and US President Donald Trump discuss West Asia War and Hormuz Strait: पश्चिम आशियात सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम आता जगभरासह भारतावरही गंभीरपणे जाणवू लागला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भारतातील एलपीजी पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, देशभरातील हजारो हॉटेल्स आणि छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले असून, अनेकांना तात्पुरते व्यवसाय बंद करावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेची माहिती स्वतः मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. चला तर जाणून घेऊया नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली.
मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये काय चर्चा झाली?
दरम्यान, पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणाची माहितीही दिली. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. भारताने तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठिंबा दर्शवला असल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सुरळीत राहणे हे संपूर्ण जगासाठी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला होता. यावेळी पश्चिम आशियातील परिस्थितीवर आमच्यात उपयुक्त चर्चा झाली. भारत लवकरात लवकर तणाव कमी करण्यास आणि शांतता प्रस्थापित करण्यास पाठिंबा देतो. होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ राहणे संपूर्ण जगासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत संपर्कात राहण्याचे आम्ही ठरवले आहे”.
मोदी राज्यसभेत काय म्हणाले?
मंगळवारी (ता. २४) राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात गॅसचा तुटवडा जाणवत असल्याची कबुली दिली. त्यांनी या युद्धजन्य परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत शांततेचे आवाहन केले. “पश्चिम आशियातील युद्धाचा आपल्या सर्वांवर परिणाम झाला आहे. हे युद्ध तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू आहे आणि त्यामुळे जगभरात इंधनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भारतातील परिस्थितीही चिंताजनक आहे,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व अधोरेखित केले. “ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. कच्चे तेल, एलपीजी आणि खतांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक याच मार्गाने होते. मात्र सध्या या मार्गावर जहाजे अडकून पडत असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर होत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांवरील अडथळे भारतासाठी अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी ठामपणे राज्यसभेत सांगितले.
या परिस्थितीचा दीर्घकालीन परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो, असा इशाराही पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात दिला. जर युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली, तर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
