नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्ष आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी-पीएम) सदस्यांसोबत बैठक घेतली. देशाच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सुधारणा प्रक्रिया आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या आर्थिक परिवर्तनाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. देशाच्या आथिक सुधारणा प्रक्रियेला अधिक वेग देणे, सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे आणि उद्योग-व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी आवश्यक उपायांबाबत सदस्यांनी आपली मते मांडल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा आणि शक्तिकांत दास यांच्यासह आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या या परिषदेचे अध्यक्ष एस. महेंद्र देव असून संजय कुमार मिश्रा, संजीव सान्याल आणि शामिका रवी हे पूर्णवेळ सदस्य आहेत. विविध क्षेत्रांतील ११ अर्धवेळ सदस्यांचाही परिषदेत समावेश आहे.

संभाव्य परिणामांचाही आढावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताचा आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार्‍या संभाव्य परिणामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.