PM Modi has failed says Shehzad Poonawalla: भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील आपला बायो बदलल्याने त्यांच्याबद्दल तर्कवितर्क लढवले गेले. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले पूनावाला भाजपात आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपाची बाजू राष्ट्रीय वाहिन्यांवर मांडणारे धुरंधर प्रवक्ते बनले होते. मात्र अचानक त्यांनी भाजपासून अंतर राखल्याचे संकेत दिले. आपण आता फक्त ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी’ असा उल्लेख त्यांनी आपल्या एक्सच्या बायोमध्ये केला. कालच्या चर्चेनंतर त्यांनी आज पंतप्रधान मोदींसाठी एक रील पोस्ट केले आहे. ज्याची चर्चा होत आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर नुकतेच जेन-झी विद्यार्थ्यांचे आंदोलन पार पडले. जेन-झींनी उपरोधिक, मीम्सच्या भाषेत केंद्र सरकारवर टीका केली होती. याच शैलीचा अवलंब करत पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधक पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हणतात, पण गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदी हे हुकूमशाही गाजवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, त्यांना काँग्रेसच्या काळात झालेली हुकूमशाही अवलंबता आली नाही, अशा स्वरुपाचे भाष्य पूनावाला यांनी उपरोधिक स्वरुपात केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला आता तरुणांचा, ट्रोलर्सचाही प्रतिसाद मिळत आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमलेल्या काही आंदोलकांनी पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करत अश्लील टिप्पणी केली होती. या टिप्पण्यांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री भाष्य केले. इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्याबाबत आणि माझ्या आईबद्दल काही जणांनी अश्लील भाष्य केले. पण मी त्या खोडकर मुलांना माफ करत आहे. त्यांच्यावर कोणताही खटला चालवला जाऊ नये.

यावरूनच शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओवर त्यांनी ‘पीएम मोदी फेल्ड’ असे लिहिले आहे. त्यामुळे ते मोदींवर टीका करत आहेत, असा समज निर्माण होतो. पण ते त्यांची प्रशंसा करत आहेत.
काय म्हणाले शहजाद पूनावाला?
पूनावाला म्हणतात, “फ्रेंड्स मी पंतप्रधान मोदींकडून निराश झालो आहे. १२ वर्ष झाले आणि ते एक अपयशी व्यक्ती ठरले आहेत. त्यांना चांगला हुकूमशहा बनता येत नाही आहे. १२ वर्ष झाले, ते हुकूमशाह बनण्याऐवजी ज्या मुलांनी त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या आईचा अपमान केला, त्यांना खोडकर मुले असल्याचे सांगून त्यांनी माफ केले. समाजाला, पोलिसांना सांगतात या मुलांना माफ करा.”
राहुल गांधी, काँग्रेसवर टीका
“दुसरीकडे राहुल गांधी जे नेहरू, इंदिरा गांधींचे वंशज आहेत. खरी हुकूमशाही काय असते, हे त्यांच्याकडून शिका मोदीजी. तीन इन्स्टाग्राम युजर्सनी केरळमध्ये राहुल गांधींचा अवमान काय केला, तिथे खटला दाखल झाला. तुम्ही कॉक्रोच पार्टीवरील आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले. पण केरळमध्ये पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कर्नाटकमध्ये फक्त फलक दाखवला त्याच्यावर केस झाली. त्यांचा इतिहास पण बघा. नेहरूंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दाबला, इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, संसदेतील सर्व खासदारांना तुरुंगात टाकले, साधू-संतावर गोळीबार कुणी केला तर इंदिरा गांधींनी…”, अशा शब्दात पूनावाला यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
“२०११ नंतर अण्णा हजारेंचे आंदोलन झाले. तेव्हा १३०० ते १५०० लोकांना तुरुंगात टाकले होते. रामदेव बाबांनाही मारले. पण तुम्ही इथे शिवीगाळ करणाऱ्या मुलांना चांगल्या मार्गावर आणण्याची भाषा वापरत आहात. पण तिकडे राहुल गांधी एका खऱ्या हुकूमशहासारखे इन्स्टाग्राम युजर्सवर केस करत आहेत. त्यांचे तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आंदोलकांना नग्न करून धिंड काढण्याची धमकी देतात. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिव्या देतात. १२ वर्ष झाले मोदीजी तुम्ही हुकूमशहा नाही बनू शकले”, अशा उपरोधिक शैलीत पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींची बाजू मांडली आहे.
डाव्या चळवळीच्या मनसुब्यावर तुम्ही पाणी घातले, तुम्ही खरंच अपयशी ठरले आहात, असे सांगत पूनावाला यांनी डाव्यांनाही टोला लगावला.
