PM Modi Foreign Trips Cost : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता गेल्या सहा वर्षांत मोदींच्या परदेश दौऱ्यांवर किती कोटी रुपये खर्च झाले? तसेच गेल्या वर्षभरात मोदींच्या परदेश दौऱ्यांचा किती कोटी खर्च आला? याची सविस्तर माहिती सरकारच्यावतीने राज्यसभेत देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या वेगवेगळ्या परदेश दौऱ्यांवर केंद्र सरकारने या वर्षी आतापर्यंत तब्बल ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच २०२१ ते जुलै २०२६ पर्यंत ५५७ कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
सरकारने काय माहिती दिली?
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि सीपीआयचे खासदार व्ही.शिवदासन यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाबाबत सविस्तर माहिती सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या वर्षी जुलैपर्यंत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर एकूण ७४,५८,९३,७९७ रुपये खर्च झाले आहेत.
मोदींनी कोणत्या देशांना भेटी दिल्या होत्या?
गेल्या काही दिवसांत पंतप्रधान मोदींनी भेटी दिलेल्या देशांमध्ये मलेशिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, इटली, फ्रान्स, स्लोव्हाकिया, सेशेल्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.
कोणत्या देशाच्या दौऱ्यात किती खर्च झाला?
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदींनी मे महिन्यात नॉर्वेला दिलेल्या भेटीदरम्यान सर्वाधिक १७,४६,५०,३९० रुपये खर्च झाले. तसेच फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर ११,९२,२५,९३८ रुपये खर्च झाले. या वर्षी आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी १३ देशांना भेटी दिल्या आहेत.
६ वर्षात किती खर्च झाला?
परराष्ट्र मंत्रालयाने असंही सांगितलं की, २०२१ ते या वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत एकूण ५,५७,५१,३४,०१८.५६ रुपये (सुमारे ५५७.५१ कोटी) खर्च झाले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान सर्वाधिक २५,५९,८२,९०२ रुपये खर्च झाले होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अशा प्रकारच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाचा तपशीलही सादर केला. या बरोबरच पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमधील द्विपक्षीय बैठका, भारतीय समुदायाशी संवाद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमधील सहभाग यांचा समावेश होता, अशी माहितीही सांगितली.
