PM Modi forgives minor girl viral video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीने अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत घोषणाबाजी केली होती. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाली. या घटनेची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असून तिला माफ केलं असल्यांच त्यांनी एका व्हिडिओमार्फत सांगितलं. मोदींच्या या कृतीमुळे संबंधित मुलीच्या आईने मोदींचे आता आभार मानले असून तिला यामुळे जीवनदान मिळालं असल्याचं ती म्हणाली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
मुलीचा पुनर्जन्म झाला
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुलीच्या आईने सांगितलं की, सूडाऐवजी माफ केल्याबद्दल पंतप्रधानांचे हात जोडून आभार मानते. हा माझ्या मुलीसाठी दुसरा जन्मच आहे. इतके घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरणाऱ्या मुलीला माफ करून पंतप्रधान मोदींनी आपलं मोठेपण दाखवून दिलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे आणि पंतप्रधान मोदींनी तिला सर्वात मोठी भेट दिली आहे, ती म्हणजे जीवनदान. आज या मुलीचा पुनर्जन्म झाला आहे”, असं त्या म्हणाल्या.
NEET-UG पेपरफुटीविरोधात जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींना लक्ष्य करून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. आपल्याला शिवीगाळ करणारे भरकटलेले आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “राग किंवा सूड हे याचं उत्तर असू शकत नाही.” यानंतर लगेचच त्या मुलीचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला. व्हिडिओमध्ये तिने स्वतःचं वय १५ वर्षे असल्याचे सांगितलं आणि आपल्या कृतीचं गांभीर्य समजल्याचं म्हटलं. “मी जे काही केलं ते क्षमेच्या पात्र नव्हतं. मी खूप वाईट गोष्टी बोलले आहे”, असं ती म्हणाली.
पहिली आणि शेवटची चूक- मुलीचा माफीनामा
कनॉट प्लेसचा फेरफटका मारल्यानंतर ती मित्रांसोबत आंदोलनाच्या ठिकाणी गेली होती आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रभावाखाली आली होती, असं तिने सांगितलं. ही आपली पहिली आणि शेवटची चूक असल्याचं सांगत तिने पुढे जोडले, “मी संपूर्ण देशाची माफी मागते. मला खूप लाज वाटत आहे. मी स्वतःच्या नजरेला नजरही देऊ शकत नाही. कृपया मला माफ करा.”
एफआयआर मागे घेणार का?
माफी मागितली असली तरी, २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्याने अपमानास्पद घोषणाबाजी केल्याप्रकरणी या मुलीविरुद्ध नोएडा पोलीस ठाण्यात आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला होता. नंतर ही तक्रार नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने आरोप केला आहे की, मुलीच्या वक्तव्याने पंतप्रधानांच्या पदाच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे आणि यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. मुलीच्या आईने सांगितलं की, तिने आणि तिच्या मुलीने वारंवार माफी मागितली आहे आणि एफआयआर मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तिने असा दावाही केला की, तिची मुलगी १५ वर्षांची अल्पवयीन असतानाही एफआयआरमध्ये तिचं वय चुकीचं म्हणजे २५ वर्षे नोंदवलं गेलं आहे.
आईने सरकारला अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून आणि आंदोलनांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्याचं आवाहन केलं. “पंतप्रधान मोदींना माझी नम्र विनंती आहे की, कृपया २० वर्षांखालील मुलांसाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक ब्लॉक करा. त्यांना फक्त अभ्यास करण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांना आंदोलनांमध्ये सहभागी होऊ देऊ नये. हे लोक फक्त मुलांचा फायदा घेऊ इच्छितात आणि त्यांच्याकडून काहीही बोलवून घेतात”, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या अल्पवयीन मुलीवरील पोलीस कारवाईवरून पंतप्रधानांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. “फक्त रीलवरच माफ करणार की केसेसही मागे घेणार?” अशी कमेंट दिपके यांनी पंतप्रधान मोदींच्या इंस्टाग्राम व्हिडिओवर केली.
