PM Modi France Visit Speech: “आज संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण असताना, भारत जगासाठी एक ‘विश्वासू सहकारी’ म्हणून पुढे येत आहे. हा भारताच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ असून देश आता केवळ स्वतःचेच नाही, तर जगाचेही भविष्य घडवत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्समध्ये केले. पॅरिसमधील ‘साले प्लेएल’ या भव्य सभागृहात अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे एक नवे पर्व सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सभागृहात उपस्थित हजारो भारतीयांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘बोंजूर मोदी’ (फ्रेंच अभिवादन-नमस्कार) अशा घोषणा देत पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले.

केवळ व्यापारच नाही, तर ‘विश्वास’ महत्त्वाचा

आपल्या हिंदी भाषणातील संबोधनात पंतप्रधान मोदींनी जागतिक समीकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा दोन देशांमधील संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित असायचे. मात्र, आजच्या काळात व्यापारासोबतच परस्परांवरील ‘विश्वास’ अधिक महत्त्वाचा ठरत आहे. सध्या प्रत्येक देशाला सुरक्षित पुरवठा साखळी आणि स्थिर भागीदारी हवी आहे. अशा काळात दीर्घकालीन विश्वासासाठी जगाची नजर भारतावर खिळली आहे.”

आपल्या हिंदी भाषणातील संबोधनात पंतप्रधान मोदींनी जागतिक समीकरणांवर भाष्य केले.

यावेळी त्यांनी फ्रान्समधील भारतीयांना ‘विकसित भारत’ या संकल्पाशी जोडण्याचे आवाहन केले. “तुम्ही भारताच्या विकास प्रवासात सहभागी व्हा. यामुळे भारताला तर बळ मिळेलच, पण तुम्हालाही तुमच्या पूर्वजांच्या भूमीची सेवा करण्याची संधी मिळेल,” असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी त्यांनी फ्रान्समधील भारतीयांना ‘विकसित भारत’ या संकल्पाशी जोडण्याचे आवाहन केले.

भारत-फ्रान्स संबंधांचा ऐतिहासिक वारसा

पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. यामध्ये त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वंशाच्या गुप्तहेर ‘नूर इनायत खान’ आणि महाराजा रणजित सिंग यांच्या सैन्यातील फ्रेंच जनरल ‘जीन-फ्रँकॉइस अलार्ड’ यांचा विशेष उल्लेख केला. हे सर्वजण भारत-फ्रान्समधील सामायिक वारशाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

चांद्रयान ते गगनयान: अंतराळात भारताची मोठी झेप!

भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी इस्रोच्या मोहिमांचा गौरव केला. “चांद्रयानच्या यशाने भारताची क्षमता जगाने ओळखली, पण भारत तिथेच थांबलेला नाही. आता देश ‘गगनयान’ मोहिमेची तयारी करत असून स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने पावले टाकत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फ्रान्समध्येही भारतीय ‘UPI’; पर्यटनाला मिळणार गती

‘डिजिटल इंडिया’चे यश आता फ्रान्समध्येही पाहायला मिळणार आहे. फ्रान्समध्ये ‘UPI’चा विस्तार होत असल्याने दोन्ही देशांमधील पर्यटनाला मोठी गती मिळेल, असे मोदींनी सांगितले. “भारत आणि फ्रान्सचे संबंध जितके घनिष्ठ आहेत, तितकेच आपले व्यवहारही डिजिटल माध्यमातून झटपट होतील,” असे ते म्हणाले. याशिवाय, मार्सिले येथील नवीन वाणिज्य दूतावास आणि फ्रेंच विमानतळांवर भारतीयांसाठी सुरू झालेली ‘व्हिसा-मुक्त ट्रँझिट’ सुविधा यामुळे दोन्ही देशांमधील दळणवळण अधिक सोपे झाले आहे.

‘त्रिश्रा’ उपग्रहाचे प्रक्षेपण पुढील वर्षी

भारत आणि फ्रान्स आर्थिक व सामरिक आघाडीवर एकत्र येत असून पुढील वर्षी दोन्ही देश संयुक्तपणे ‘त्रिश्रा’ (TRISHNA) हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. हा उपग्रह जागतिक स्तरावर पाणी आणि अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच पुढील महिन्यापासून लागू होणारा ब्रिटनसोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) आणि युरोपीय संघासोबत (EU) सुरू असलेली चर्चा यामुळे भारतीय शेतकरी, कामगार आणि नवसंशोधकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत.

१२ वर्षांचा कार्यकाळ… ‘चहाविक्रेता ते पंतप्रधान’ ही देशाच्या लोकशाहीची ताकद

पंतप्रधान म्हणून केंद्रात १२ वर्षे पूर्ण झाल्याचा संदर्भ देत मोदींनी भारतीय लोकशाहीचे कौतुक केले. “देशाचा पंतप्रधान म्हणून सलग १२ वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. एका सामान्य चहाविक्रेत्याला या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवणे, ही भारताच्या सशक्त लोकशाहीचीच ताकद आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

गेल्या १२ वर्षांत केवळ आर्थिक प्रगतीच झाली नाही, तर मोठे सामाजिक परिवर्तनही झाले असून २५ कोटी जनता गरिबीरेषेतून बाहेर आली आहे. आजचा तरुण, देशातील महिला आणि शेतकरी नव्या आत्मविश्वासाने पुढे जात असून येणारा काळ हा भारताच्या महत्त्वाकांक्षांचा असेल, असा विश्वास पंतप्रधानांनी शेवटी व्यक्त केला.