स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशभरात स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसचे पेव फुटले असून, याचा मोठा आर्थिक फटका मध्यमवर्गीय आणि गरीब पालकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आता विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन डिजिटल कोचिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार

आपल्या भाषणात कोचिंग संस्कृतीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजकाल कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठे ओझे बनली आहे. आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये पाठवले नाही, तर आपण समाजात मागे पडू किंवा प्रतिष्ठेचे राहणार नाही, अशी भीती पालकांच्या मनात निर्माण केली जाते. यासाठी पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. या माध्यमातून कुटुंबांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक ताण कमी करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून जवळ राहून अभ्यास करण्याची संधी देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.”

सरकारकडे दर्जेदार डिजिटल पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ शिक्षकांची मोठी फळी उपलब्ध आहे. या सर्व संसाधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन पुरवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१ कोटी तरुणांना एआय (AI) कौशल्याचे प्रशिक्षण

कोचिंग क्लासेसच्या घोषणेसोबतच तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा विस्तार वेगाने होत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा भारतीय तरुणांना व्हावा, यासाठी येत्या एका वर्षात देशातील १ कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे (AI Skills) विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या उपक्रमामुळे भारतातील तरुण जागतिक स्तरावर एआय क्षेत्राचे नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि गोंधळामुळे गेल्या काही काळात देशात, विशेषतः दिल्लीतील जंतर-मंतर येथे तरुणांची आंदोलने पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर, पारदर्शक आणि मोफत ऑनलाइन कोचिंग देण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.