नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था उभारण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लालकिल्ल्यावरील भाषणातून केली. आगामी एका वर्षात एक कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना भविष्यासाठी सज्ज करण्यावर सरकारचा भर असल्याचे मोदी स्पष्ट झाले.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदी यांनी शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रातील विविध उपक्रमांचा उल्लेख केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणार्‍या खासगी कोचिंग संस्थांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक भार पडतो. हा भार कमी करण्यासाठी तरुणांना मोफत कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येईल, असे मोदींनी सांगितले.

वर्षभरात १ कोटी तरुणांना ‘एआय’चे प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धिमत्ता ही अर्थव्यवस्था आणि रोजगार क्षेत्रात निर्णायक तंत्रज्ञान ठरणार आहे. आगामी वर्षात एक कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. भारतातील तरुण तंत्रज्ञानाच्या बदलत्या जगात मागे राहू नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्यविकासाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी वर्षात एक कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते मागे राहणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

० तरुणांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे वळवण्यासाठी देशात १० हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब्स उभारण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

० शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि नवकल्पनांची आवड निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

० भारतीय तरुणांनी स्वत:चा उपग्रह अवकाशात पाठवला, ही देशासाठी मोठी उपलब्धता असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात अडीच लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स असल्याचा उल्लेख करत मोदी यांनी नवउद्योजकतेच्या वाढत्या वातावरणाकडे लक्ष वेधले.

० परदेशी विद्यापीठेही भारतात येत असून, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची क्षमता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘एआय इम्पॅक्ट समिट’सारख्या उपक्रमांमुळे या क्षेत्रातील भारताच्या प्रयत्नांना चालना मिळत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

‘जनगणनेत तरुणांनी सहभागी व्हावे’

देशात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेत तरुणांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. प्रत्येक तरुणाने आपल्या कुटुंबातील माहिती अचूकपणे नोंदविण्यासाठी एक-दोन तास देण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारी प्रतिनिधी माहिती संकलनासाठी घरी येतात, तेव्हा नावे किंवा इतर तपशील नोंदविताना अक्षरलेखनाच्या चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे डिजिटल माध्यमातून नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची माहिती अचूकपणे नोंदविण्यास मदत करावी, असे मोदी यांनी सांगितले. तुम्ही आपल्या कुटुंबांना मदत करा, अचूक माहिती भरा आणि जनगणनेच्या या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

‘महिला आरक्षणासाठी सहकार्य करा’

मोदींनी महिला आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. संसद व राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांसाठी आरक्षण लागू करण्याच्या उपक्रमात तुम्ही (विरोधक) सहभागी व्हा आणि त्याचे श्रेयही तुम्ही घ्या, असेही मोदी म्हणाले. नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये संमत होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, केंद्र सरकारने महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले गेले. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान या घटनादुरुस्ती विधेयकाला काँग्रेससह ह्य्इंडियाह्ण आघाडीतील विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्नही अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर मोदींनी महिला आरक्षणाचा भाषणात जाणीवपूर्वक उल्लेख केल्याचे स्पष्ट झाले. मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना घटनादुरुस्ती विधेयकाबाबत सर्वसंमतीचे आवाहन केले.

राहुल गांधी, खरगे दुसर्‍या वर्षीही गैरहजर

काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोघेही सलग दुसर्‍या वर्षी मोदींच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गैरहजर राहिले. २०२४ च्या सोहळ्यात राहुल गांधी यांच्या मान्यवरांच्या शेवटून दुसर्‍या रांगेत बसवले गेले होते. गांधी व खरगे यांना पहिल्या रांगेत बसवणे अपेक्षित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा असतानाही राहुल गांधींना मागे बसवून सरकारने परंपरा व शिष्टाचाराचा भंग केला व राहुल गांधींचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर गेल्या वर्षीही राहुल गांधी व खरगे लाल किल्ल्यावरील सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते.