फ्रान्समध्ये सध्या जी-७ देशांची परिषद सुरू आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेदेखील उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सागरी सुरक्षेचा प्रश्न यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान म्हणाले, “आज जगात सर्वात जास्त कमतरता जर कशाची भासत असेल, तर ती विश्वास या मूल्याची आहे. एकमेकांमध्ये विश्वासाचे नाते प्रस्थापित होणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. आपले समुद्री मार्ग तसेच नाविक आज सुरक्षितपणे प्रवास करू शकत आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.” हॉर्मुझ सामुद्रीधुनीमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला, याच घटनेला पंतप्रधान मोदींनी अधोरेखीत केले. मोदी पुढे म्हणतात, “आपल्याच देशाच्या नव्हे तर सर्वंच देशांच्या नाविकांचा संरक्षण करणं ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.”

“आंतरराष्ट्रीय भागीदारीत संवादाला प्राधान्य द्या” – मोदी

इराण व अमेरिकेच्या शांतता करारावर मोदी म्हणाले, “या युद्धामध्ये आमच्या पश्चिम आशियातील मित्रदेशांचे फार मोठे नुकसान झाले आहे. फार मोठी जीवितहानी झाली असून यात भारतातील नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. या काळात सर्वंच देशांचे आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे जागतिक ऐक्याला फार मोठा धोका याच काळात निर्माण झाला होता हे विसरून चालणार नाही.”आंतरराष्ट्रीय भागिदारीत संवादाला, चर्चेला प्राधान्य दिलं पाहिजे. ती प्रतिष्ठेच्या आड येता कामा नये. या अनिश्चिततेच्या युगात तंत्रज्ञान व व्यापाराचा स्वहितासाठी गैरवापर करण्यात आला. यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशांमधील परस्परातील विश्वासाला गालबोट लागले. भविष्यात जर चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील, तर आपल्याला पुन्हा विश्वासाचे नाते प्रस्थापित करावे लागणार आहे आणि जागतिक ऐक्य साधावे लागणार आहे.

दात्याची भूमिका नको, भागिदारीसाठी प्रयत्न हवेत…

मोदींनी संसाधनांच्या गरजेवरही भाष्य केले, ते म्हणतात… “जागतिकीकरणाच्या या काळात ऊर्जा, अन्न, स्वास्थ्य, सायबर तसेच आर्थिक सुरक्षेसाठी आपण सर्वंच देश एकमेकांवर विसंबून आहोत. आंतरराष्ट्रीय भागिदारीसाठी मानवतेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनाच एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील. दक्षिण आशियातील देशांना भागिदारीची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण एकमेकांना मदत करण्यासाठी एखाद्या दात्याची भूमिका घेण्याऐवजी भागिदारीसाठी प्रयत्न करायला हवेत.”

मानवतेच्या विकासासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील

या परिषदेच्या भाषणात मोदी शेवट करतांना म्हणाले, “भारत हा मानवतेची कास धरणारा देश आहे. आणि जगात मानवता अबाधित राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आंतरराष्ट्रीय सौर प्रकल्पातील समावेश असो, आपत्तीरोधक पायाभूत सुविधांसाठी केलेले प्रयत्न असोत, जागतिक जैव-इंधन प्रकल्पातील समावेश असो, किंवा भारताचे लाईफ ‘एक पेड माँ के नाम’ मिशन असो, भारताने नेहमीच मानवतेच्या हिताच्या प्रकल्पांमध्ये आपले योगदान दिले आहे. जेव्हा-जेव्हा नैसर्गिक संकटं आली तेव्हा-तेव्हा भारत नेहमीच इतर देशांच्या पाठीशी उभा राहिला आहे. श्रीलंकेतील वादळ असो किंवा अफगाणिस्तानमधील भूकंप असो अन्यथा मोझांबिक व जमायिकामधील चक्रीवादळ; ही सर्वंच उदाहरणं भारताच्या जागतिक ऐक्यातील योगदानाचा दाखला देतात.”

युद्धानंतर ही पहिलीच जी-७ देशांची परिषद भरविण्यात आलेली होती. या परिषदेच्या पूर्वसंध्येला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सर्वंच नेत्यांचे ही परिषद जिथे संपन्न झाली त्या एवियन-लेस-बेन्स शहरातील एका रिसॉर्टमध्ये स्वागत केले.