पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यादरम्यान तेथील प्रमुख नेत्यांना भारताच्या कला, संस्कृती आणि बौद्धिक परंपरेची साक्ष देणाऱ्या विशेष भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंमध्ये हाताने विणलेले कापड, पारंपरिक कलाकृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ आणि आदिवासी हस्तकलेचा समावेश होता. जागतिक स्तरावर भारताचा सांस्कृतिक वारसा पोहोचवण्याचा आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याचा हा एक प्रयत्न होता.

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना ‘महाभारत’ कलाकृती आणि सिल्क स्टोल

पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध ‘कलमकारी’ चित्र भेट दिले. या चित्रात महाभारतातील विविध प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. पारंपारिक पेन-ड्रॉइंग तंत्राचा वापर करून हे चित्र तयार करण्यासाठी तब्बल सहा महिने लागले होते.

handwoven textiles and traditional artworks
या चित्रात महाभारतातील विविध प्रसंग रेखाटण्यात आले आहेत.

मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना तेलंगणाचा प्रसिद्ध ‘पोचंपल्ली सिल्क स्टोल’ भेट म्हणून देण्यात आला. हा स्टोल ‘इकात’ या पारंपारिक रंगकाम आणि विणकाम पद्धतीचा वापर करून बनवला जातो, जो आपल्या भौमितिक डिझाईन्ससाठी ओळखला जातो.

स्लोव्हाकियाच्या राष्ट्रपतींसाठी पारंपरिक कलाकृती

स्लोव्हाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांना पंतप्रधानांनी भारताच्या विविध प्रांतांमधील उत्कृष्ट हस्तकलेचे नमुने भेट दिले. त्यामध्ये थेवा कफलिंक्स राजस्थानची अत्यंत दुर्मिळ आणि प्रसिद्ध असणारी ‘काचेवर सोन्याचे नक्षीकाम’ करण्याची ‘थेवा कला’ वापरून बनवलेले कफलिंक्स त्यांना देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध ‘हिमरू’ सिल्कची टाय आणि पॉकेट स्क्वेअर सेट त्यांना भेट दिला गेला, जो रेशीम आणि कापसाच्या उत्कृष्ट विणकामासाठी ओळखला जातो.

handwoven textiles and traditional artworks
पितळेचा डोकरा हरीण (अँटीलोप) सेट

छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील आदिवासी कलाकारांनी ‘लॉस्ट-वॅक्स’ (मेण वितळवून धातू ओतण्याची पद्धत) या प्राचीन तंत्राने बनवलेला पितळेचा डोकरा हरीण (अँटीलोप) सेट त्यांना देण्यात आला.

स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांना काश्मिरी गालिचा

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना पंतप्रधान मोदींनी जगप्रसिद्ध ‘काश्मिरी सिल्क कारपेट’ (गालिचा) भेट दिला. काश्मीर खोऱ्यातील नैसर्गिक सौंदर्य आणि फुलांच्या डिझाईन्सने नटलेला हा गालिचा संपूर्णपणे हाताने विणलेला आहे.

संसद अध्यक्षांना आयुर्वेद ग्रंथ आणि ‘ठेकुआ’ची भेट

स्लोव्हाकियाच्या संसदेचे अध्यक्ष रिचर्ड राशी यांना बिहार आणि झारखंडमधील छठ पूजेचा प्रसिद्ध पारंपरिक गोड पदार्थ ‘ठेकुआ’ भेट म्हणून देण्यात आला. याशिवाय, त्यांना भारताच्या प्राचीन वैद्यकीय ज्ञानाची ओळख करून देणारे ‘सुश्रुत संहिता’ आणि ‘चरक संहिता’ हे आयुर्वेदाचे दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ भेट दिले गेले. हे ग्रंथ भारताच्या प्राचीन शस्त्रक्रिया, शरीरशास्त्र आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीची साक्ष देतात.