PM Modi Giorgia Meloni G7 Summit Melodi Viral Video: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ (G7) परिषदेदरम्यान जागतिक घडामोडींइतकीच एका खास भेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण संवादाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या भेटीदरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून, “होय, आम्ही इन्स्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध कपल आहोत,” अशी मिश्किल टिप्पणी केली. यामुळे इंटरनेटवर पुन्हा एकदा ‘मेलोडी’ हा ट्रेंड अवतरला आहे.

जी-७ परिषदेत अमेरिका, ब्रिटनसह जगातील बलाढ्य देशांचे नेते एकत्र आले आहेत. युक्रेन युद्धाला पाठिंबा आणि अमेरिका-इराणमधील महत्त्वाचे करार यांवर चर्चा सुरू असतानाच, मोदी आणि मेलोनी यांच्यातील या अनौपचारिक संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

…आणि पंतप्रधान मोदी म्हणाले, “मेलोडी!”

ग्रुप फोटोसाठी सर्व जागतिक नेते एकत्र येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील तिथे उपस्थित होते. व्हिडिओमधील ऑडिओ स्पष्ट नसला, तरी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा संदर्भ मेलौनी यांना दिल्याचे समजते.

त्यावर हसतमुख उत्तर देत मेलोनी म्हणाल्या, “होय, आम्ही इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त प्रसिद्ध असणारे कपल आहोत.” त्यावर पंतप्रधान मोदींनीही हसत, “मेलोडी” असा उल्लेख केला.

रोमला जाताना मोदींनी दिली होती ‘पारले मेलोडी’ची भेट!

या मजेशीर संवादाची पार्श्वभूमी महिनाभरापूर्वीच्या एका घटनेशी जोडलेली आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा रोमच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांना भारताची प्रसिद्ध चॉकलेट टॉफी ‘पार्ले मेलोनी’चे (Parle’s Melody) एक पाकीट भेट म्हणून दिले होते. सोशल मीडियावरील ‘Melodi’ या ट्रेंडला दिलेली ही एक गोड दाद होती.

मेलोनी यांनी या भेटीचा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. “पंतप्रधान मोदींनी माझ्यासाठी अत्यंत चविष्ट टॉफीची भेट आणली आहे,” असे मेलोनी या व्हिडिओत म्हणाल्या होत्या. या दोघांचा हा ‘चॉकलेट डिप्लोमसी’चा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला होता.

कशी झाली ‘Melodi’ ट्रेंडची सुरुवात?

जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्या नावांचे संमिश्रण करून नेटकऱ्यांनी २०२३ मधील द्विपक्षीय बैठकीनंतर ‘Melodi’ हा शब्द तयार केला होता. सुरुवातीला एक इंटरनेट जोक म्हणून सुरू झालेल्या या ट्रेंडला खुद्द मेलोनी यांनीही आपलंसं केलं.

  • २०२४: मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा सेल्फी शेअर करत लिहीले होते, “Hi friends, from #Melodi.”
  • २०२५: जी-७ परिषदेतील एका सेल्फी व्हिडिओला त्यांनी “Hello, from the Melodi team” असे कॅप्शन दिले होते.

जागतिक व्यासपीठांवर या दोन नेत्यांमध्ये दिसणारी सहज आणि सुसंवादी मैत्री ही केवळ कॅमेऱ्यापुरती मर्यादित नसून, भारत आणि इटली यांच्यातील मजबूत होत चाललेल्या राजनैतिक संबंधांचे ते प्रतीक मानले जाते.

भारत-इटली ‘परराष्ट्र धोरणाचा’ नवा अध्याय

पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्यातील हा सुसंवाद केवळ सोशल मीडिया पुरता मर्यादित नाही, तर त्यामागे दोन्ही देशांचे मोठे धोरणात्मक हितसंबंध आहेत. सध्याच्या जागतिक परिस्थितीत इटली हा भारताचा युरोपमधील अत्यंत महत्त्वाचा भागीदार बनला आहे.

  • आर्थिक कॉरिडोअर: ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोअर’ (IMEC) यशस्वी करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. यामध्ये इटलीची भूमिका युरोपचे प्रवेशद्वार म्हणून महत्त्वाची आहे.
  • द्विपक्षीय व्यापार: भारत आणि इटली दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार तब्बल $१६.७७ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे १.४ लाख कोटी रुपये) वर पोहोचला आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान मेलोनी यांनी त्यांच्यासाठी एका विशेष जेवणाचे आयोजन केले होते. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी इटलीच्या ऐतिहासिक ‘कोलोसियम’ला भेट देत दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर सखोल चर्चा केली होती. तीच मैत्री आता जी-७ च्या मंचावर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.