इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ‘मेलडी’ चॉकलेट भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. समाजमाध्यमावर या दोन नेत्यांशी ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी दिवसभर त्याची चर्चा होती. पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्याच्या अखेरच्या टप्प्यात मंगळवारी इटलीला पोहोचले. दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून एक खूपच छान टॉफी आणली, मेलडी.

या भेटवस्तूबद्दल धन्यवाद,’ असे मेलोनी यांनी बुधवारी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून सांगितले. त्यात मेलोनी यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी उपस्थित होते, या मेलडीवरून विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यावर ‘राहुल गांधी भारताचा द्वेष करतात, तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला आदर मिळत असल्याचे राहुल यांना सहन होत नाही,’ असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

‘मेलडी’ ट्रेंडिंगमध्ये ’ इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी २०२३ मध्ये दुबई येथे झालेल्या ‘सीओपी२८’ दरम्यान मोदी आणि मेलोनी यांचे नाव एकत्र करून ‘मेलडी’ हा हॅशटॅग तयार केला होता. ’ यानंतर जागतिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही नेत्यांमधील सौहार्दपूर्ण संवादानंतर तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाला. बुधवारच्या चॉकलेट भेटीनंतर ‘मेलडी’ हॅशटॅग दिवसभर ‘ट्रेंडिंग’मध्ये होता.

काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान लक्ष्य

देशावर मोठे आर्थिक वादळ घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटत असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, गुंतवणुकीला बसलेली खीळ आणि रुपयाची घसरण, तसेच अर्थव्यवस्था संकटात असतानाही मोदी यांनी ‘पीआर’ जोमाने सुरू ठेवला आहे, अशी टीका केली. हे नेतृत्व नाही, तर पळवाट आहे. देशातील शेतकरी, मजूर, व्यापारी आणि इतर सर्वजण त्रस्त असताना, पंतप्रधान रील्स बनवत आहेत, तर भाजपचे लोक त्यावर टाळ्या वाजवत आहेत. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस