Uddhav Thackeray Birthday : पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय संघातील मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

uddhav thackeray narendra modi
ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज ६१ वा वाढदिवस आहे. राज्यात सध्या अनेक संकटांची मालिकाच सुरू असल्याचे दिसत आहे, करोनाचे संकट ओढावलेले असताना आता अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातलं आहे. अनेक दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीव देखील गमावावा लागल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझा वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवरुन अनेक मान्यवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना चित्र पहायला मिळत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय संघातील मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घाष्यु मिळो अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय अजिंक्य रहाणेनेही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दिर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” असं अजिंक्य म्हणालाय.

याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरेंनी वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं.

राज्यावर एकामागून एक येणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका असं उद्धव ठाकरेंनी सोमवारीच स्पष्ट केलं होतं. “कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये.”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

तसेच, “वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये, तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू.” असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. “राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, म्हणून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

“पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm modi greets maharashtra cm uddhav thackeray on birthday scsg