देशामध्ये ठराविक भूमिका घेणाऱ्या अनेक व्यक्तींना वाय दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर निशाणा साधलाय. शिवसेनेनं होलसेलमध्ये वाय दर्जाची सुरक्षा पुरवूनही काश्मीरमधील हवा स्थीर नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारच्या काश्मीर विषयक धोरणांवर टीका करताना लगावला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिर्गदर्शक विवेक अग्निहोत्रींना पुरवण्यात आलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरुन काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केल्यानंतर राज्यातील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी पडळकर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना त्यांनी दहशतवाद्यांना न जुमानता श्रीनगरमधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता असं राऊतांवर टीका करताना म्हटलंय.

नक्की वाचा >> “वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…”; अमृता फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर संजय राऊतांचं उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना जुमानलं नाही
सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर आल्याची टीका करणाऱ्या शिवसेनेवर पडळकर यांनी टीका केली. शिवसेनेचे प्रवक्ते असणाऱ्या राऊत यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी राऊत यांचा उल्लेख ‘जनाब राऊत’ असा केलाय. “जनाब राऊत तुमच्या माहितीसाठी जेव्हा लाल चौकात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये अशा पद्धतीची धमक्या देणारी पोस्टर लावली होती. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धमक्यांना भीक न घालता, धमक्यांना न जुमानता लाल चौकामध्ये तिरंगा फडकवून दाखवला होता,” असं पडकळर म्हणालेत. २६ जानेवारी १९९२ रोजी मोदींनी मुरली मनोहर जोशी आणि इतर भाजपाच्या नेत्यासोबत लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता. त्याच घटनेची आठवण पडळकरांनी करुन दिलीय.

नक्की वाचा >> “माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं…”; गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना दिलं चॅलेंज

देशातील वातावरण भयमुक्त होईल असं वाटलेलं पण…
शिवसेनेनं आजच्या ‘समाना’ अग्रलेखातून केंद्र सरकारच्या सुरक्षाविषयक धोरणांवर टीका केलीय. या लेखात देशात भयमुक्त वातावरण नसल्याचा टोला शिवसेनेन लगावला आहे. तसेच दहशतवादी कारवायांसंदर्भातील भाष्यही शिवसेनेनं केलंय. “देशातील वातावरण भयमुक्त व मोकळे होईल असे मोदी आल्यापासून वाटत होते, पण नेमके उलटे घडत आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयानंतर देशातील अतिरेकी प्रवृत्तींचा बीमोड होईल, अशी ‘मन की बात’ पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली, पण देशाला अतिरेकी, धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांपासून कसा धोका आहे हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा व तसा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे,” असा टोला या लेखातून लागवण्यात आलाय.

मोदी-शहांच्या राज्यात हे असे का घडावे?
“उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे ही एक घातक हुकूमशाहीची नांदी आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान ‘एमआयएम’चे प्रमुख मियां ओवेसींवर हल्ला होतो व लगेच केंद्र सरकारतर्फे त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देत असल्याची घोषणा होते, ही एक मिलीजुली योजनाच असायला हवी. मोदींचे सरकार येऊन सात वर्षांची सप्तपदी झाली तरी प्रत्येक स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील सोहळ्याआधी अतिरेकी पकडले जातात. स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर हल्ला करण्याचा कट उधळून लावला, असे जाहीर केले जाते. मोदी-शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? हिजाबचा निकाल दिला म्हणून न्यायमूर्तींना असुरक्षित का वाटावे? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

‘वाय’वाल्यांची फौज उभी करून देशात भ्रम निर्माण केला
“बरं, इतकी सुरक्षा देऊनही कश्मीरातील हवा अस्थिरच आहे व कश्मिरी पंडितांची घर वापसी सुरक्षेच्या कारणास्तव रखडलेलीच आहे. जे भाजपापुरस्कृत लोक राजकीय विरोधकांना धमक्या देत आहेत, भाजपाचा अजेंडा न्यायालयात व केंद्रीय तपास यंत्रणांत रेटून नेत आहेत, त्यांना ‘वाय’ सुरक्षा व्यवस्था पुरविल्याचा डंका वाजवून आणि अशा ‘वाय’वाल्यांची फौज उभी करून देशात भ्रम निर्माण केला जात आहे. लोकांना भयाच्या सावटाखाली ठेवले जात आहे. हे एक राष्ट्रीय तसेच राजकीय धोरणच दिसते. ‘वाय’ सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते,” असं शिवसेनेनं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi hoist tricolor in lal chowk in srinagar says gopichand padalkar while criticizing sanjay raut scsg
First published on: 22-03-2022 at 11:09 IST