करोनाच्या दुसऱ्या लाटेत मदत केल्याबद्दल मोदींनी कमला हॅरीस यांच्याकडे व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले…

नरेंद्र मोदी यांनी हॅरीस यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

Kamala Harris Narendra Modi
दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची भेट घेतली. यावेळी भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याची भावना हॅरीस यांनी व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोविड साथीच्या काळात कमला हॅरीस यांच्या मदतीची आठवण करून दिली.

“उपराष्ट्रपती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरीस यांचे एकतेचे शब्द मला आठवले. अमेरिकी सरकार, कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि हॅरीस यांनी स्वतः अशा वेळी पदभार स्वीकारला जेव्हा संपूर्ण जगाला एक अतिशय कठीण आव्हान भेडसावत होते आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी कोविड किंवा हवामान बदलांसारख्या आपत्तींसोबत लढा देत यश मिळवले,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रासह अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य या विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट; दहशतवादी संघटनांच्या भूमिकेवरून पाकिस्तानला इशारा

“अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी सीमेपलीकडील दहशतवादाबाबत पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शवली आणि भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरल्याचे मान्य केले. हॅरीस यांनी अशा दहशतवादी गटांच्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. हॅरीस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही,” असे हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले.

कमला हॅरीस यांनी भारतात येण्याचे निमंत्रण

भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील. भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मोदींचा हा पहिला औपचारिक संवाद होता. याआधी जूनमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवर चर्चा झाली. हॅरीस यांनी कोविड साथीच्या काळात भारताला अमेरिकन लस देण्यासाठी प्राधान्य दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi in us pm meets australias morrison kamala harris later vsk