नवी दिल्ली : ‘सेवा तीर्थ’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे तसेच कर्तव्य भवन-१ आणि २ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने (पीएमओ) बुधवारी दिली.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शुक्रवारचा हा उद्घाटन सोहळा भारताच्या प्रशासकीय शासन रचनेतील एक परिवर्तनीय मैलाचा दगड ठरणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या कचेऱ्या आणि मंत्रालये ‘सेंट्रल व्हिस्टा’ परिसरातील विखुरलेल्या आणि जुन्या इमारतींमधून कार्यरत होत्या. या विखुरलेल्या स्वरूपामुळे कामकाजात अकार्यक्षमता, समन्वयाचा अभाव, देखभालीचा वाढता खर्च आणि कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येत होत्या. या नवीन इमारतींमुळे प्रशासकीय कार्ये एकाच ठिकाणी आधुनिक आणि भविष्यकालीन सुविधांसह एकत्रित होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
‘सेवा तीर्थ’मध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय असेल, जे पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. तर ‘कर्तव्य भवन १ आणि २’ मध्ये कायदा, संरक्षण, वित्त, आरोग्य, कृषी आणि इतर महत्त्वाच्या मंत्रालयांची सोय करण्यात आली आहे.

