जामनगर : जगातील वेगवेगळे देश साथरोगांवर मात करण्यासाठी पारंपरिक औषधांकडे वळत असल्याने आयुर्वेद, सिद्ध, युनानी औषध उत्पादनांना मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगरमधील वैश्विक पारंपरिक औषधांच्या केंद्रात (जीसीटीएम) या औषधांची तपासणी आणि प्रमाणन हे जागतिक दर्जाचेच व्हायला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बजावले.

या केंद्राचे भूमिपूजन मोदी यांच्याहस्ते झाले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रिवद कुमार जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस घेब्रेसस उपस्थित होते. मोदी म्हणाले की, आणखी २५ वर्षांनी जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला शंभर वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी प्रत्येक घरात पारंपरिक उपचारांना स्थान मिळालेले असेल. जगभरातील पारंपरिक औषधोपचारांना या केंद्रात स्थान मिळाले पाहिजे. त्यामुळे पुढील पिढय़ांना लाभ मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या केंद्राबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने भागिदारी केली असून त्यातून भारताच्या या क्षेत्रातील योगदानाचा गौरव झाला आहे, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.